पोलीस आयुक्तालयातील डांबरीकरण केलेला रस्ता उखडून वाहिनीचे काम सुरू

पुणे पोलीस आयुक्तालयाचे आवार सध्या कात टाकतेय. अनेकविध उपक्रम सुरू करण्यात आले असून पोलीस आयुक्तालयाचे आवार चकचकीत करण्यात येत आहे. गेल्या आठवडय़ात पोलीस आयुक्तालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून युद्धपातळीवर नवीन रस्ता तयार करून घेण्यात आला. काही कारणास्तव मुख्यमंत्री आयुक्तालयात येऊ शकले नाहीत, पण आठवडाभरापूर्वी केलेला तोच रस्ता सांडपाणी वाहिनी टाकण्याच्या कामासाठी उखडण्यात आला आहे.

महापालिकेच्या दोन विभागांत समन्वय नसल्यामुळे असे प्रकार बऱ्याचदा घडत असल्याचे पाहायला मिळते. शहरात एखाद्या रस्त्याचे डांबरीकरण केल्यानंतर पुन्हा तेथे महापालिकेतील दुसऱ्या विभागाकडून रस्ते खोदाईचे काम सुरू होते. असाच प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून झाला आहे.

पोलीस आयुक्तालयाच्या आवारात दहा दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून डांबरीकरण करण्यात आले. पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी सुरू केलेला ‘भरोसा सेल ’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार होते. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून युद्धपातळीवर डांबरीकरण करून रस्ता तयार करण्यात आला.

मात्र, मुख्यमंत्री फडणवीस पोलीस आयुक्तालयात येऊ शकले नाहीत, त्यामुळे ‘भरोसा सेल’चे उद्घाटन लांबणीवर पडल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

दरम्यान, नवीन डांबरीकरण करण्यात आलेला रस्ता पुन्हा पूर्णपणे उखडण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तेथे सांडपाणी वाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले असून पोलीस आयुक्तालयातील प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांमध्ये ताळमेळ नसल्याने आठवडाभरापूर्वी करण्यात आलेला चकचकीत रस्ता उखडण्यात आला.

पोलीस आयुक्तालयातील वाहने रस्त्यावर

पोलीस आयुक्तालयातील रस्ता खोदण्यात आल्याने आवारात वाहने लावण्यास जागा उपलब्ध नाही. त्यामुळे पोलीस आयुक्तालयातील वाहने सध्या रस्त्यावर लावण्यात येत आहेत. मुख्य टपाल कार्यालयाच्या पाठीमागील बाजूच्या रस्त्यावर सध्या दुचाकी तसेच चारचाकी वाहने दाटीवाटीने लावली जात आहेत. या भागात सेंट पॉल तसेच सेंट हेलेनाज या शाळा आहेत, तसेच शासकीय कार्यालये आहेत. शाळा तसेच शासकीय कार्यालय सुटल्यानंतर या भागात वाहतूक कोंडी होत आहे.

प्रवेशद्वाराचे काम सुरू; तक्रारदारांची कुचंबणा

पोलीस आयुक्तालयातील प्रवेशद्वाराचे काम सध्या सुरू आहे. तक्रारदार नागरिक या रस्त्याने पोलीस आयुक्तालयात प्रवेश करतात. उखडलेला रस्ता आणि प्रवेशद्वाराचे काम सुरू असल्याने तक्रारदार नागरिकांची कुचंबणा होत आहे. खड्डय़ातून वाट काढत तक्रारदार पोलीस आयुक्तालयात प्रवेश करतात.

Story img Loader