पुणे : पुणे विमानतळावरील विमानसेवेला बुधवारी पुन्हा खराब हवामानाचा फटका बसला. पुणे विमानतळावरून जाणारी दोन आणि येणारी तीन अशी पाच विमाने रद्द करण्यात आली. यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. याचबरोबर विमानतळावरील सेवेतील गोंधळामुळे प्रवाशांच्या गैरसोयीत आणखी भर पडली. यामुळे प्रवासी आणि विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींमध्ये वाद झाल्याचेही प्रकार घडले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची बदली; अमितेश कुमार नवीन पोलीस आयुक्त

पुणे विमानतळावर बुधवारी एकूण ५ विमाने रद्द झाली. त्यात चंडीगड, गुवाहाटी आणि गोव्यातून येणारी ३ विमाने रद्द झाली. तसेच, चंडीगड, गुवाहाटीला जाणारी दोन विमाने रद्द झाली. पुणे विमानतळ प्रशासनाने खराब हवामानामुळे ही विमाने रद्द झाली, अशी माहिती विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी दिली. विमानतळावरील चुकीच्या नियोजनाचाही प्रवाशांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. प्रवाशांना चेक-इन करण्यासाठी एका तासाहून अधिक काळ रांगेत उभे राहावे लागल्याचे चित्र दिसून आले.

हेही वाचा >>> मराठा सर्वेक्षणाबाबत पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांनी केली ‘ही’ तक्रार

देशात उत्तरेतील राज्यांतील धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने १३ जानेवारीपासून विमाने रद्द होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक विमानांना पाच ते सहा तासांहून अधिक विलंब होत आहे. खराब हवामानाचा विमानसेवेला फटका मोठ्या प्रमाणात बसत आहे. विमाने रद्द होण्याचे प्रमाण कायम असून, यामुळे प्रवाशांच्या प्रवास नियोजन कोलमडून पडत आहे.

सहा तासांचा विलंबानंतर विमान रद्द स्पाईसजेटचे पुणे ते दिल्ली विमान हे मंगळवारी रात्री सहा तासांच्या विलंबानंतर रद्द करण्यात आले. विशेष म्हणजे आधी या विमानाला उशीर होणार असल्याचे सांगण्यात आले. नंतर प्रवाशांना विमानात बसविण्यात आले. त्यानंतर काही वेळाने विमान रद्द झाल्याचे सांगत प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. यामुळे विमानतळावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. संतप्त प्रवाशांनी विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर बुधवारी सकाळी प्रवासी दुसऱ्या विमानाने दिल्लीला रवाना झाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bad weather canceled many flights at pune airport pune print news stj 05 zws