पुणे : राज्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसात २३ लाख ९० हजार ५७१ शेतकऱ्यांचे १२ लाख ८७ लाख १४५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना मदतीसाठी निकषांनुसार १३७९ कोटी रुपयांच्या मदतीची गरज आहे. अवकाळीचा मोठ्या क्षेत्राला फटका बसल्यामुळे खरिपातील शेतीमालासह फळे, भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात झालेला अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे राज्यातील १२ लाख ८७ हजार १४५ हेक्टरवरील शेतीपिकाचे ३३ टक्क्यांहून जास्त नुकसान झाले आहे. राज्यातील ३६ पैकी ३३ जिल्ह्यांमध्ये नुकसान झाले असून, ३३ पैकी सहा जिल्ह्यांत एक लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. अमरावतीमध्ये १,८५,६९६ हेक्टर, अकोल्यात १,८८,४२७ हेक्टर, बुलडाण्यात १,५७,१८१ हेक्टर, हिंगोलीत १,२१,८८७ हेक्टर, जालन्यात १,१६,९४६ हेक्टर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये १,४२,१८४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
हेही वाचा >>>अयोध्येतील राममंदिर अक्षता वितरणाची पुणे महानगरात सुरुवात; माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, अजित पवार यांना निमंत्रण
२३.९० लाख शेतकऱ्यांना १३७९ कोटींच्या मदतीची गरज
अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे राज्यातील एकूण २३ लाख ९० हजार ५७१ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशिम आणि अमरावती जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या प्रत्येकी दोन लाखांहून जास्त आहे. किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात तुलनेने कमी नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १३७९ कोटी रुपयांच्या मदतीची गरज आहे. नुकसानीच्या तीव्रतेनुसार मराठवाडा आणि अमरावती महसूल विभागातील जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना सर्वाधिक मदतीची गरज आहे.
या पिकांचे नुकसान
खरीप पिके – भात, बाजरी, तूर, ज्वारी, मका, हरभरा, गहू, कांदा, ऊस, कापूस.
फळपिके – आंबा, काजू, पेरू, द्राक्ष, डाळींब, केळी, पपई, संत्रा, मोसंबी, बोर, लिंबू.
भाजीपाला, अन्य पिके – हळद, मिरची, पालेभाज्या, फळभाज्या पिके, गळीत धान्ये आणि फूल शेती.
एल-निनोमुळे थंडीचे प्रमाण कमीच
एल निनोमुळे उत्तर ध्रुवासह आर्क्टिक प्रदेश, सैबेरियासारख्या अतिथंड प्रदेशातील किमान तापमान अपेक्षित प्रमाणात खाली गेले नाही. त्यामुळे उत्तरेकडून दक्षिण आशियाकडे वाहणारा थंड हवेचा प्रवाह क्षीण आहे. परिणामी यंदा थंडीचे प्रमाण कमी राहिले. उत्तर भारताला हिवाळ्यात दर वर्षी पाच ते सात थंडीच्या लाटांचा सामना करावा लागतो. डिसेंबरपर्यंत थंडीची एकही लाट आली नाही. पुढील दीड महिन्यात थंडीच्या लाटा येण्याची शक्यता कमीच आहे. आल्याच तर एक किवा दोन थंडीच्या लाटांचा सामना करावा लागेल, अशी माहिती हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.