गेल्या कित्येक वर्षांपासून पिंपरी-चिंचवडमध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी अर्थात चैत्र पौर्णिमेला श्री म्हातोबा देवाचे बगाड मिरवणूक काढली जाते. पिंपरी-चिंचवड, वाकड, हिंजवडी, मुळशी तालुका आणि पुणे जिल्ह्यातले भाविक यंदाच्या वर्षीही या यात्रेसाठी मोठ्या उत्साहात आले होते. पिंपरी-चिंचवडच्या हिंजवडी भागात याही वर्षी बगाड यात्रेला नेहमीच्याच उत्साहात सुरुवात झाली खरी. पण मानकरी बगाडावर चढताच बगाडाचा शेला, ज्याला शासन काठीही म्हटलं जातं, ती मधोमध तुटली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून ही घटना घडली तेव्हा तिथे मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते. पण सुदैवाने या घटनेत कुणालाही इजा झाली नाही.
हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी होत असतानाच मोठा आवाज झाला!
हिंजवडी गावातील म्हातोबा देवाची आज यात्रा होती. अनेक वर्षांच्या परंपरेनुसार या यात्रेत बगाडाची प्रथा आहे. यंदा श्रीधर जांभुळकर यांना गळकरीचा मान होता. सायंकाळी बगाड सुरू झालं तेव्हा हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी सुरू झाली. सर्व भाविक बगाडाच्या आजूबाजूला जमा झाले होते. देवाच्या नावाने घोषणाही दिल्या जात होत्या. गळकरी श्रीधर जांभुळकर बगाडावर चढले आणि पुढच्या काही क्षणांत बगाड मधोमध तुटलं.
काही क्षण काय घडलंय हे कुणालाच समजलं नाही. शासन काठी तुटल्यामुळे गळकरी पुन्हा खाली आले. पण सुदैवाने त्यांना किंवा इतर कुठल्या भाविकाला या अपघातात कोणतीही इजा झाली नाही. मात्र, असं असलं, तरी गेल्या कित्येक वर्षांमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारे बगाड तुटल्यामुळे भाविकांमध्ये नाराजी पसरली.
बुधवारी पुण्यातील जुन्नर तालुक्यातही अशीच घटना घडली होती. पारुंडे गावातील यात्रेतील बगाडाची प्रदक्षिणा सुरू असतानाच ते मधोमध तुटलं अन दोन मानकरी जखमी झाले होते.