पुणे : मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा असल्याची घोषणा बागेश्वरमहाराज ऊर्फ धीरेंद्र शास्त्री यांनी सोमवारी केली. मराठय़ांच्या बरोबर आम्ही आहोत, मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा आहे, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. जगद्गुरू संत तुकाराममहाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यासाठी मी माफी मागतो, असे सांगून बागेश्वरमहाराज यांनी ‘वेळ मिळाल्यानंतर मी तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी जाणार आहे’ असे सांगितले.
हेही वाचा >>> पुणे: जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची पुण्यात बदली; गोळीबाराच्या घटनेनंतर दोशी सक्तीच्या रजेवर
भारत गुलामीत होता तेव्हा मराठय़ांनी शौर्य दाखवून स्वातंत्र्य मिळवून दिले होते. त्यामुळे बागेश्वर पीठ मराठा समाजाबांधवांच्या सोबत आहे. त्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, असेही बागेश्वरमहाराज यांनी स्पष्ट केले. बागेश्वरमहाराज म्हणाले, की सत्संगामध्ये बोलत असताना एका शब्दाचे अनेक अर्थ निघतात. त्याप्रमाणे कोण व्यक्ती कोणता शब्द घेतो त्यावरून त्याची भूमिका ठरते. मी कधीही रावणाशी दूरध्वनीवर बोललेलो नाही. पण कथा सांगताना उदाहरण म्हणून दृष्टान्त दिला जातो. त्या अर्थाने मी बोललेलो आहे. तसेच आजार बरे करण्यासाठी रुग्णालयात गेलेच पाहिजे.