‘अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्य़ावर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर’, ‘अरे खोप्यामंदी खोपा सुगरणीचा चांगला देखा, पिलासाठी तिने जीव झाडाले टांगला’, ‘अरे माणसा माणसा कधी व्हशील माणूस’ अशा सोप्या आणि आशयघन कवितांतून प्रत्येकाच्या मनात घर करून राहिलेल्या बहिणाबाई चौधरी यांचे काव्यधन आता साहेबाच्या भाषेत गेले आहे. माधुरी शानभाग यांनी बहिणाबाईंच्या कवितांचा इंग्रजी अनुवाद केला असून ‘फ्रेग्रन्स ऑफ द अर्थ’ हा कवितांचा संग्रह लवकरच वाचकांच्या भेटीला येत आहे.
खान्देशातील सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या आणि घरच्या गरिबीमुळे शाळेची पायरी चढू न शकलेल्या बहिणाबाईंच्या काव्यरचना मात्र, शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत. निरक्षर बहिणाबाईंनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर निर्मिलेल्या काव्यरचनांतून जगण्यातील अर्थ तर सोप्या पद्धतीने उलगडला आहेच; पण त्याचबरोबरीने शाश्वत मूल्यांची पेरणी केली आहे. अहिराणी बोलीतील या रचना बहिणाबाईंचे पुत्र कवी सोपानदेव चौधरी आणि त्यांचे मावसभाऊ यांनी जतन करून ठेवल्या. सोपानदेवांनी आचार्य अत्रे यांना या रचना दाखविल्या. ‘अरे, हा तर मोहोरांचा हंडा आहे’ असे गौरवोद्गार काढत अत्रेंनी हे काव्यधन प्रकाशात आणले. बहिणाईंच्या निधनानंतर १९५२ मध्ये रसिकांसमोर आलेल्या या रचनांचे गारुड मराठी माणसांवर ६० वर्षांनंतरही कायम आहे. आता माधुरी शानभाग यांनी अनुवाद केलेल्या या रचनांमुळे भाषेचा अडसर दूर करीत बहिणाबाई यांचे काव्य मराठीच्या कक्षा ओलांडत जगभरात जात आहे.
हा अनुवाद म्हणजे अहिराणीतील सुगंधाला इंग्रजी भाषेच्या कुपीत ओतण्याचा प्रयत्न असल्याची भावना माधुरी शानभाग यांनी व्यक्त केली. या प्रक्रियेमध्ये थोडा सुगंध सांडला खरा, पण या काव्यातील अलंकार, लय आणि गेयता सांभाळण्यापेक्षाही त्यातील मानवतेचा धागा आणि करुणेचा कलाम पोहोचवावा हा प्रामणिक प्रयत्न केला आहे. निवडक रचनांचा अनुवाद ज्येष्ठ साहित्यिक प्रा. के. ज. पुरोहित यांना दाखविल्यानंतर त्यांनी मला प्रोत्साहन दिले. त्यामुळे हा प्रयत्न पूर्णत्वास नेण्याचे बळ मिळाले असे शानभाग यांनी सांगितले. बहिणाई या पूर्णत: निसर्गाशी जोडल्या गेलेल्या होत्या. त्याचे प्रतििबब त्यांच्या काव्यामध्ये जागोजागी दिसून येते. आपल्या दैनंदिन जीवनातील प्रतिमा आणि रुपके वापरत त्यांनी साध्या-सोप्या शब्दांत चिरंतन विचारांची पेरणी केली. त्यांनी केलेली कवितेची मांडणी आजही कालसंगत अशीच आहे. अहिराणी बोलीतील तो गोडवा अनुवादामध्ये कितपत कायम राखता आला याविषयी मी काही सांगणे योग्य होणार नाही. एरवी अनुवाद ही कारागिरी असते. मात्र, बहिणाबाईंच्या काव्यप्रतिभेचा अनुवाद हा स्वतंत्र निर्मितीचा अनुभव देणारा होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एका मातीचा वास
माधुरी शानभाग म्हणाल्या,‘‘या अनुवाद प्रक्रियेमध्ये संसार, गीता, भागवत असे मराठी बोलीतील शब्द हे तसेच ठेवले आहेत. अनुवादानंतर तळटीप देऊन या शब्दांचा अर्थ इंग्रजीमध्ये सांगितला आहे. संसार या शब्दाचे विवेचन तर पानभर देण्यात आले आहे. त्याच्या जोडीला बहिणाबाई यांचे अल्पचरित्रदेखील दिले आहे. बहिणाबाई यांच्या काव्यप्रतिभेसंदर्भात आचार्य अत्रे, बा. भ. बोरकर, पु. ल. देशपांडे, इंदिरा संत या मान्यवर साहित्यिकांची स्फुटे, त्याचबरोबरीने मालतीबाई किलरेस्कर आणि प्रभा गणोरकर यांनी केलेली समीक्षादेखील या पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. एका मातीचा वास दुसऱ्या भाषेला लागावा या प्रयत्नाला प्रकाशामध्ये आणण्यासाठी ‘राजहंस’ प्रकाशनचे कोंदण लाभले आहे.