पुणे : अमली पदार्थ तस्करी प्रकरणात ससूनच्या उपाहारगृहातील कामगार रौफ शेख याचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी शुक्रवारी फेटाळला. अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलने ससून रुग्णालयातून अमली पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात शेख याला अटक करण्यात आली आहे.

चाकण भागात ललित पाटीलकडून कोट्यवधी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. याप्रकरणात त्याला अटक करण्यात आली. त्याला येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते. ललित उपचाराच्या बहाण्याने ससून रुग्णालयात दाखल झाला होता. उपचाराच्या बहाण्याने दाखल झालेल्या ललितने ससूनमधून मेफेड्रोनची विक्री सुरू केल्याची माहिती पुणे पाेलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने गेल्या वर्षी ३० सप्टेंबर रोजी ससून रुग्णालयाच्या परिसरात सापळा लावून ललितचा साथीदार सुभाष मंडल आणि ससूनच्या उपाहारगृहातील कामगार रौफ शेखला पकडले. त्यांच्याकडून दोन कोटी २० लाख रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले. पोलिसांनी तपास करून ललित पाटीलसह साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली.

हेही वाचा – टोमॅटोचा भाव वधारला, किरकोळ बाजारात दर ८० रुपये किलोवर

हेही वाचा – सुप्रिया सुळे यांची अजितदादांच्या निवासस्थानी भेट; ‘हे’ आहे कारण

येरवडा कारागृहात असलेल्या रौफ शेखने याप्रकरणात जामीन मिळवण्यासाठी त्याचे वकील ॲड. राजेश वाघमारे यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला. शेख याच्या जामीन अर्जास सरकारी वकिलांनी विरोध केला. शेख ललितच्या सांगण्यावरून काम करत होता. अमली पदार्थ विक्री प्रकरणात तो सामील होता. याबाबतचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत, असा युक्तिवाद सरकार पक्षाकडून करण्यात आला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने शेखचा जामीन अर्ज फेटाळला.