गेल्या ५० दिवसांपासून काम ‘बंद’ आंदोलन पुकारलेल्या बजाज ऑटोच्या चाकण येथील प्रकल्पातील कामगारांनी मंगळवारी कामावर परतण्याचा निर्णय घेतला. कामावर परत रुजू होऊन मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णयही विश्वकल्याण कामगार संघटनेने घेतला आहे. बुधवारपासून सर्व कामगार कामावर परतणार आहेत.
कामगारांना शेअर मिळावेत, कामगारांवर केलेल्या कारवाया मागे घ्याव्यात, नवीन करारावर बोलणी करावी, आदी मागण्यांसाठी विश्वकल्याण कामगार संघटनेचे २५ जूनपासून आंदोलन सुरू होते. त्यातच कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी ‘कामगार सात दिवसांत रुजू न झाल्यास कंपनीचे निम्मे उत्पादन औरंगाबाद किंवा पंतनगर येथे कायमचे स्थलांतरित करू,’ असा इशारा गेल्या सोमवारी दिला होता. १२ ऑगस्टपर्यंत हा तिढा सुटावा, त्यादृष्टीने कामगारांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून रूजू व्हावे, अन्यथा कंपनीसमोर पर्याय राहणार नाही, असेही त्यांनी म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर कामगार संघटनांनी आंदोलन सुरूच ठेवून कामावर परतण्याचा निर्णय घेतला.
सातत्याने कामगारविरोधी धोरणे राबवणाऱया व त्यातच धन्यता मानणाऱया बजाज संस्कृतीने कामगारांच्या भावना या आंदोलनातून समजून घेणे अपेक्षित होते. परंतु, ते सौजन्य बजाज व्यवस्थापनाने दाखवले नाही. बजाज व्यवस्थापनाला त्यांच्या कामगारहित विरोधी धोरणात सुधारणा करण्याची संधी देण्याच्या हेतूने कामगारांनी काम बंद आंदोलन मागे घेऊन कामावर रुजू होण्याचा निर्णय घेतल्याचे श्रमिक एकता महासंघाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

Story img Loader