बाजीराव-मस्तानी या चित्रपटाचे प्रदर्शन शुक्रवारी पुणे आणि पिंपरीत झाले. या चित्रपटातील वादग्रस्त दृश्यांवरून भारतीय जनता पक्ष आणि पतित पावन संघटनेने विविध चित्रपटगृहांसमोर आंदोलन केले. पुण्यात सिटीप्राईड आणि मंगला चित्रपटगृहासमोर कार्यकर्त्यांनी घोषणा देत चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाला खेळ रद्द करण्यास भाग पाडले.
बाजीराव-मस्तानी चित्रपटात वादग्रस्त दृश्ये आहेत. जनभावनेचा आदर करून हा चित्रपट प्रदर्शित करू नये, असे पत्र भारतीय जनता पक्षातर्फे सिटीप्राईड चित्रपटगृहाचे संचालक अरविंद चाफळकर यांना गुरुवारी देण्यात आले होते. भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे कोथरूड विधानसभा अध्यक्ष रितेश वैद्य यांच्या नेतृत्वाखाली उदय कड, सचिन पोलाने, दिनेश माझिरे, अनिल काळभोर, विरेश भेलके आदींच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी कोथरूडमध्ये निदर्शने करण्यात आली. त्यामुळे चित्रपटाचे सकाळचे तीन खेळ रद्द करण्यात आले.
दरम्यान, पतित पावन संघटनेतर्फ मंगला चित्रपटाच्या आवारात आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी आवारात असलेली चित्रपटाची पोस्टर्स फाडून टाकली. चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाने दुपारचे खेळ रद्द करण्याचे आश्वासन यावेळी दिले.
चलाखी अन् कार्यकर्त्यांचे ‘फोटोसेशन’
‘िपगा’ गाण्यातील काशीबाई आणि मस्तानीचे एकत्रित नृत्य, ‘मल्हारी’ गाण्यामधील बाजीरावाचे थिल्लर नृत्य, यामुळे सुरुवातीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या बाजारीव-मस्तानी चित्रपटाच्या विरोधात भाजपने पिंपरीत निदर्शने केली. मल्टिप्लेक्संचालकांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. मात्र, चित्रपटाची आगाऊ तिकीट विक्री झाल्याचे सांगत खेळ सुरूच ठेवले. आंदोलकांनीही ‘फोटोसेशन’ झाल्यानंतर आंदोलन थांबवले.
भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी चिंचवडला ‘बिग सिनेमा’समोर सकाळी निदर्शने केली. प्रत्येकाने पाच कार्यकर्त्यांसह यावे, असा निरोप देण्यात आला होता. प्रत्यक्षात जेमतेम संख्येनेच कार्यकर्ते जमले होते. सहायक पोलीस आयुक्त मोहन विधाते यांनी बाहेरच त्यांना अडवले. पोलिसांच्या सूचनेनुसार व्यवस्थापक बाहेर आले आणि त्यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. सकाळचे खेळ झाले की दुपारचे रद्द करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
प्रत्यक्षात, दुपारनंतरचे खेळ रद्द झालेच नाहीत. ऑनलाईन तिकीट विक्री सुरूच होती आणि प्रेक्षकांचे लोंढे चित्रपटगृहाकडे येत होते. िपपरीतील ‘विशाल ई स्क्वेअर’मध्येही सकाळपासून चित्रपटाचे खेळ विनाअडथळा सुरू होते. प्रेक्षक, विशेषत: तरुणाई चित्रपट पाहण्यास उत्सुक होती. त्यामुळे आंदोलनाची धास्ती न बाळगता पहिल्या खेळापासून तुफान गर्दी होती. हेच चित्र सायंकाळी उशिरापर्यंत कायम होते.
बाजीराव मस्तानीचे खेळ बंद पाडणे, निदर्शने करणे, अंडी फेकणे याच्याशी पेशव्यांचा संबंध नाही. काही संघटना, पक्ष आमचे नाव घेऊन आंदोलन करीत आहेत. आमचा विरोध दोन गाण्यांना आहे आणि तो कायम आहे. ही गाणी वगळल्याशिवाय आम्ही चित्रपट पाहणार नाही. लोकांनी काय करायचं ते ज्याने त्याने ठरवावे.
– महेंद्र पेशवा, पुष्कर पेशवा (पेशव्यांचे वंशज)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा