मोबाईल्स, गाडय़ा, कपडे, पुस्तके, फर्निचर यांची ऑनलाईन खरेदी-विक्री आता नवीन राहिली नाही. मात्र, या वर्षी ईदीसाठी बकऱ्यांचीही ऑनलाईन खरेदी-विक्री सुरू झाली आहे. छोटय़ा जाहिरातींच्या संकेतस्थळांवर बकऱ्यांचे फोटो आणि किमती झळकत आहेत.
बकरी ईदसाठी दरवर्षी बकऱ्यांच्या खरेदी-विक्रीचे मोठय़ा प्रमाणावर व्यवहार होतात. दरवर्षी या कालावधीत प्राण्यांची उलाढाल चालणाऱ्या बाजारपेठेत मोठी उलाढाल होते. ईदसाठी बकरा खरेदी करताना तो केवढा आहे, त्याचे खूर कसे आहेत, रंग कोणता आहे, काही खुणा आहेत का.. अशी सगळी पाहणी करून बकरे खरेदी केले जातात. मात्र, या वर्षी काही व्यापाऱ्यांनी या बाजारापेक्षा जरा हटके पर्याय स्वीकारला आहे. छोटय़ा जाहिरातींच्या संकेतस्थळांवर बकऱ्यांच्या खरेदी-विक्रीच्या जाहिराती झळकत आहेत.
राज्यातून जवळपास १२० जाहिराती दिसत आहेत. गुरुवारपासून या जाहिरातींचा ओघ वाढला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, चिंचवड याबरोबरच अगदी फलटण, जुन्नर या भागातील जाहिरातीही दिसत आहेत. पुणे आणि परिसरातील ३० ते ४० जाहिराती आहेत. गावरान, अजमेरी, इंदुरी, सिरोही अशा विविध जातींचे बोकड विक्रीसाठी आहेत. आपल्याकडील बकरा कसा बहुगुणी आहे हे पटवण्यासाठी त्याच्या मालकांनी बकऱ्यांचे सविस्तर वर्णन आणि फोटो अपलोड केले आहेत. वजन, लक्षण यानुसार बकऱ्यांच्या किमती दिसत आहेत. चाँद असलेल्या बोकडाची किंमत सर्वाधिक आहे. काहींनी फ्री होम डिलिव्हरीचे आमिषही दाखवले आहे. ‘बकरे हवे आहेत’ अशाही जाहिराती या संकेतस्थळांवर दिसत आहेत.
‘तीन बकऱ्यांच्या जाहिराती अपलोड केल्या होत्या. त्याला प्रतिसाद मिळाला आहे. त्याचप्रमाणे एकाची विक्री झाली आहे. बाजारापर्यंत बकरा घेऊन जाण्यापेक्षा हा पर्याय सोपा वाटल्याचे,’ जाहिरात देणारे एजाज कुरेशी यांनी सांगितले.’ चाँद असलेल्या एका बकऱ्याची ८० हजार रुपयांना विक्री झाल्याची माहिती एका विक्रेत्याने दिली आहे.
किमती ६ हजार ते साडेतीन लाख
या संकेतस्थळांवरील जाहिरातींमध्ये साधारण सहा हजार रुपयांपासून बकऱ्यांची किंमत आहे. ती अगदी साडेतीन लाख रुपयांच्या घरात गेली आहे. डोक्यावर चाँद असलेल्या एका बकऱ्याची किंमत साडेतीन लाख रुपये असल्याचे जाहिरातीत म्हटले आहे. सरासरी १५ ते २० हजार रुपयांच्या घरात सर्वाधिक बकरे विक्रीला आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा