एकीकडे खासगी निर्मात्यांनी तयार केलेले साहित्य वापरून शिक्षण अधिक रंजक करण्यासाठी शासकीय पातळीवरून प्रयत्न सुरू असतानाच आता बालभारतीनेही पहिली आणि दुसरीसाठी टॉकिंग बुक्स तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
सध्या इ-लर्निगचे साहित्य हे खासगी निर्मात्यांकडूनच तयार होते आहे. मात्र, आता बालभारतीनेही फक्त पाठय़पुस्तक निर्मितीच्या पुढे जाऊन अभ्यासपूरक साहित्याची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिली आणि दुसरीच्या पुस्तकांची टॉकिंग बुक्स तयार करण्यात येणार असल्याची माहिती बालभारतीचे संचालक चंद्रमणी बोरकर यांनी दिली. टॉकिंगबुक्स कशी असावीत, त्यात कोणत्या मुद्दय़ांचा समावेश असावा, सादरीकरण कसे असावे अशा विविध मुद्दय़ांवर काम सुरू करण्यात आले असून तांत्रिक बाबींसाठी बालचित्रवाणीची मदत घेतली जाणार असल्याचेही बोरकर म्हणाले.
त्याचप्रमाणे पुस्तकांमधील चुका टाळण्यासाठीही विद्यार्थी आणि शिक्षकांकडून सूचना मागवण्यात येणार आहेत. या सूचनांचा अभ्यास करून त्यानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. विविध विषयांच्या अभ्यास मंडळांकडे याबाबतचे काम देण्यात आले आहे. विविध घटकांनी दिलेल्या सूचनांचा अभ्यास करून त्यानुसार पुस्तकांत बदल करण्यात येतील, अशी माहिती बोरकर यांनी दिली. सध्या पाचवी आणि सहावीच्या नव्या पुस्तकांच्या निर्मितीचे काम सुरू आहे. मार्च-एप्रिलपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे.
सचिवांना नवी जबाबदारी देणार
बालभारतीच्या सचिवांच्या बदलीची मागणी कर्मचाऱ्यांकडून पूर्वीपासूनच करण्यात येत होती. त्यासाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलनही केले. कर्मचाऱ्यांच्या दबावामुळे सचिवांचा पदभार काढून घेण्यात आला. सचिवांना लवकरच नवा कार्यभार देण्यात येईल, असे बोरकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Story img Loader