फक्त दहा कोटी रुपयांची तरतूद सुचवून बालगंधर्व रंगमंदिराच्या जीर्णोद्धाराचा विषय ऐरणीवर आणल्याबद्दल महापालिकेचे आभारच मानायला हवेत. संपूर्ण देशात नाटक या क्षेत्रात सातत्याने काही घडतच असेल, तर ते पुण्यात. अनेक हौशी नाटय़संस्था आजही सातत्याने रंगभूमीवर नवनवे प्रयोग करत असतात आणि त्याला रसिकांकडून उत्तम प्रतिसादही मिळत असतो. पण हे महापालिकेला आणि तेथे निवडून गेलेल्या नगरसेवकांना कधीच पाहवले नाही. एकतर सांस्कृतिक क्षेत्राशी संबंध असणारे नगरसेवक एका हाताच्या बोटांएवढेही नाहीत. दुसरे म्हणजे त्यातल्या कुणालाही नाटक कशाशी खातात, याचे सोयरसुतक नाही. त्यामुळे ऐन मोक्याच्या जागी बांधलेले बालगंधर्व रंगमंदिर पाडून तेथे नाटय़संकुल उभारण्याची कल्पना मांडण्यामागील सगळेच हेतू शुद्ध असण्याची शक्यता नाही.
गेल्या काही दशकांत पुणे महापालिकेने शहराच्या विविध भागांत उभारलेली नाटय़गृहे पाहता, पालिकेला त्यातले काहीही कळत नाही, हे पुरेसे स्पष्ट होते. औंधमधील पं. भीमसेन जोशी कलामंदिरातील नाटय़प्रयोगात कलावंतांना विंगेत जाताच समोरच्या खांबावर आदळून कपाळमोक्ष होण्याची वेळ आली होती. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक भवन काय किंवा यशवंतराव चव्हाण नाटय़गृह काय किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन काय? सगळीकडे बकालपणा आणि घाणीचे साम्राज्य. यशवंतराव चव्हाण नाटय़गृहाच्या आवारात वाहने ठेवण्यासाठीची जागाही नगरसेवकांच्या डोळय़ांना खुपली. त्यामुळे त्या जागी संकुल उभारण्याची मूर्ख कल्पना कुणालाही न विचारता, कोणताही विचार न करता प्रत्यक्षात आणण्याचे धैर्य ते करू शकले. आपल्याला विचारणारे कोणी नाही, त्यामुळे आपण म्हणू तीच पूर्व अशा खाक्यामुळे या नाटय़गृहाला जी अवकळा आली आहे, ती दूर करणे आता कधीच शक्य नाही.
एवढी सारी नाटय़गृहे बांधणाऱ्या महापालिकेचा हा पूर्वेतिहास पाहता, त्यांना बालगंधर्व रंगमंदिराच्या जागेत नाटय़संकुल उभारण्यास सगळय़ा पुणेकरांनी स्पष्टपणे नकार द्यायला हवा. सगळय़ांना विश्वासात घेऊनच नवी योजना आखण्यात येईल, असे सांगण्यात येत असले, तरी आजवरचा अनुभव पाहता, असे काही घडण्याची शक्यता नाही. बालगंधर्व रंगमंदिरात नाटकांपेक्षा राजकीय कार्यक्रम अधिक होतात आणि त्यासाठी जाहीर झालेल्या नाटय़प्रयोगांच्या तारखा काढून घेण्यात, कोणत्याही राजकीय पक्षांस जराही लाज वाटत नाही. हे रंगमंदिर पुन्हा नव्याने केवळ याच कारणासाठी बांधायचे आहे, हे म्हणूनच सर्वानी लक्षात घ्यायला हवे. नाटय़संकुल बांधणे ही काळाची गरज खरी, पण ती पार पाडण्यास पुणे महानगरपालिका जराही सक्षम नाही, हेही तेवढेच खरे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या कार्यक्रमांसाठी एक स्वतंत्र सभागृह बांधावे आणि तेथे खुशाल आपापल्या नेत्यांच्या आरत्या ओवाळाव्यात. उगाच आहे ते मोडून नवे अधिकच वाईट निर्माण करण्याचा हा सोस राजकीय हेतूंनी प्रेरित आहे, हे लक्षात घ्यायला हवे.
स्वच्छतागृहांमधील दुर्गंधी ज्या पालिकेला दूर करता येत नाही, परिसर किमान स्वच्छ ठेवता येत नाही, पुरेशा पार्किंगची व्यवस्था करता येत नाही, त्या पालिकेने या पुढील काळात नाटय़गृहे बांधण्याचे प्रयोग करून कोटय़वधींचा चुराडा करू नये. जे आपल्याला जमत नाही, हे पुन:पुन्हा सिद्ध झाले आहे, त्या वाटेला जाण्याचे खरेतर काही कारणच नाही. पण तरीही नगरसेवक असा हट्ट करतात. त्यामागे त्यांची असलेली गणिते सामान्यांना मात्र कळत नाहीत. बालगंधर्व रंगमंदिर पाडून तेथे नवे नाटय़संकुल उभारण्यापेक्षा शेजारच्या स्वा. सावरकर भवनाचे पुनर्निर्माण करून भव्य टोलेजंग इमारत बांधावी आणि राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमांसाठी एक भव्य सभागृह त्यात तयार करावे. त्यामुळे एकाच दगडात दोन पक्षी मारता येतील. एक म्हणजे नवे बांधकाम करण्याची व त्यामुळे होणाऱ्या अनुषंगिक खर्चाची तरतूद करता येईल आणि दुसरे म्हणजे आपल्या नेत्यांसाठी काही स्मारक उभारल्याचे पुण्यही मिळेल.
जे चांगले चालले आहे, त्याची तोडमोड करण्यापेक्षा अधिक ‘भरीव’ करण्याची संधी पालिकेला अनेक क्षेत्रांत आहेच की!
मुकुंद संगोराम mukund.sangoram@expressindia.com