पिंपरी : ‘केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले हे मनसेला महायुतीत घेऊ नका, याबाबत नेहमीच बोलत असतात. आठवले यांना राज्यसभा, लोकसभेतही गांभीर्याने घेतले जात नाही. त्यांना आम्हीही गांभीर्याने घेत नसल्याची टीका मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली.

आठवले यांनी गेल्या आठवड्यात मनसेला महायुतीत घेऊ नका, असे वक्तव्य केले होते, या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. नांदगावकर म्हणाले, ‘आठवले यांना कोणीच गांभीर्याने घेत नाही, आम्हीही त्यांना गंभीर्याने घेत नाही’ .’समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना काहीतरी भडक बोलून लक्ष वेधून घेण्याची सवय आहे. ‘मुस्लिम समाजाचे आपणच तारणहार’, असे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. सरकारने त्यांच्यावर कडक कारवाई करावी. धनंजय मुंडे यांना मंत्रिपद द्यायला नको होते. आरोप झाल्यानंतरही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडे यांना पाठिशी घातले. मागणीनंतर ८३ दिवसांनी मुंडे यांनी राजीनामा दिला. या सर्व प्रकारावरून ‘हे राज्य अराजकतेकडे जात नाही ना’, हे बाळासाहेब ठाकरे यांचे वाक्य आठवते.’ असे नांदगावकर म्हणाले.

‘छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी भविष्यात कोणीही चुकीचे वक्तव्य करू नये. अभिनेते राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी’, अशी मागणीही त्यांनी केली. ‘स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणखी पुढे जाणे जनतेच्या हिताचे नाही. या निवडणुका लवकर होतील, असे वाटत नाही, असेही ते म्हणाले. ‘राज्यात मराठीच्या वापराबाबत कायदा केला. तरीही त्याची कोणी दखल घेत नाही. राज्य मराठीचे आणि त्याच राज्यात मराठी भाषेसाठी लढावे लागते, ही शोकांतिका आहे.’ अशी टीकाही त्यांनी केली.

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी मेळावा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवड शहरात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रविवारी (९ मार्च) सकाळी साडेनऊ वाजता मेळावा होणार असल्याचे नांदगावकर यांनी सांगितले.

Story img Loader