पुणे : स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गावरील बालाजीनगर येथील स्थानक भारती विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर होणार आहे. या नवीन स्थानकामुळे स्थानकांमधील अंतरावरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्या पार्श्वभूमीवर ‘महामेट्रो’कडून विविध स्थानकांमधील अंतर निश्चित करण्यात आले आहेत. या मार्गावरील सर्वाधिक २.११ किलोमीटर इतक्या अंतराचा एकमेव टप्पा मार्केट यार्ड ते पद्मावतीदरम्यानचा असेल. उर्वरित तीन स्थानकांमधील अंतर एक ते सव्वा किलोमीटरपर्यंत निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार भाडेदर निश्चिती केली जाईल.

‘महामेट्रो’कडून स्वारगेट ते कात्रज सुमारे ५.६५ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालामध्ये (डीपीआर) मार्केट यार्ड, पद्मावती, कात्रज अशी तीन स्थानके प्रस्तावित आहेत. मात्र, लोकप्रतिनिधी आणि स्थानिकांच्या आग्रहास्तव बालाजीनगर येथील स्थानक निश्चित करण्यात आले. मात्र, पद्मावती ते कात्रज हे अंतर अवघे १.९ कि.मी असल्याने नव्याने बालाजीनगर येथील स्थानकामुळे दोन स्थानकांमधील अंतरामध्ये किती फरक असणार, यावरून चर्चा होती.

हेही वाचा – नवीन वर्षात महिलांना ‘गुलाबी रिक्षा’ मिळणार, राज्यभरातून कसा आहे प्रतिसाद?

महामेट्रोकडून बालाजीनगर येथील स्थानक भारती विद्यापीठ प्रवेशद्वारासमोर निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार स्वारगेट ते मार्केट यार्ड हे पहिले स्थानक १.३१ किलोमीटर अंतरावर असून, मार्केट यार्ड ते पद्मावती २.११ किलोमीटर, पद्मावती ते भारती विद्यापीठ १.२३ किलोमीटर आणि भारती विद्यापीठ ते कात्रज १ किलोमीटर अंतर असेल. त्यानुसार नजीकच्या आणि जास्त अंतरासाठी किती दर असणार, याचे नियोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती महामेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे यांनी दिली.

नवीन स्थानकाच्या खर्चाबाबत राज्य सरकारकडे प्रस्ताव

या भूमिगत मेट्रो मार्गासाठी सुमारे २ हजार ९५४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पात पुणे महापालिकेचा आर्थिक सहभाग १५ टक्के (४८५ कोटी) असेल. या प्रकल्पासाठी लागणारी जागा महापालिका देणार असून, तिची किंमत (२४८ कोटी) असेल, तर भारती विद्यापीठ येथील स्थानकाचा खर्चाबाबत राज्य सरकाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. त्यानुसार निर्णय घेण्यात येणार आहे.

हेही वाचा – पुणे स्टेशन परिसरातील साधू वासवानी उड्डाणपुलाबाबत महानगरपालिकेचे ठरलं !

भू-वैज्ञानिक सर्वेक्षणाचे काम सुरू

स्वारगेट- कात्रज हा पूर्णत: भूमिगत मार्ग असणार आहे. त्यासाठी १०० फूट जमिनीखालून खोदकाम करावे लागणार आहे. त्यानुसार आवश्यक जमिनीचे भू-वैज्ञानिक सर्वेक्षण महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या तज्ज्ञांकडून सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे.

स्थानकांमधील अंतर कसे असेल?

  • स्वारगेट ते मार्केट यार्ड – १.३१ किलोमीटर
  • मार्केट यार्ड ते पद्मावती – २.११ किलोमीटर
  • पद्मावती ते भारती विद्यापीठ – १.२३ किलोमीटर
  • भारती विद्यापीठ ते कात्रज – १ किलोमीटर

स्वारगेट ते कात्रज या भूमिगत मेट्रो मार्गावरील भारतीय विद्यापीठ येथे नवीन स्थानक निर्माण झाल्याने या मार्गावरील अंतरामध्ये फरक पडला, हे निश्चित आहे. मात्र, नवीन स्थानकामुळे परिसरातील नागरिकांना याचा फायदा होणार असून, अंतराची सुनिश्चितता करून स्थानकांचे नियोजन करण्यात आले आहे. – हेमंत सोनवणे, कार्यकारी संचालक, महामेट्रो

Story img Loader