पुणे : भारत जोडो यात्रे दरम्यान काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी स्वा.सावरकरांविषयी वादग्रस्त विधान केल्याने भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना राज्यभरात आक्रमक झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील सारसबागेसमोरील स्वा. सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन पुणे संपर्क प्रमुख अजय भोसले आणि शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
हेही वाचा: पुणे: कोथरूडमधील श्रावणधारा सोसायटीला आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
यावेळी शहरप्रमुख नाना भानगिरे म्हणाले की, राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली. पण त्यांनी ही यात्रा करण्यापेक्षा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे साहित्य वाचावे , त्यामुळे त्यांना देश समजण्यास मदत होईल. त्याच बरोबर ब्रिटिशांकडून स्वा. सावरकर हे पेन्शन घेत होते हे राहुल गांधी यांचे विधान निषेधार्थ असून आता आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून राहुल गांधी यांच्या दिल्ली येथील घरी पेन्शन पाठविणार असल्याच त्यांनी सांगितले.