लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: बालभारती ते पौड रस्त्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा दोन दिवसांत नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची माहिती, तज्ज्ञांचे अभिप्राय महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याची ग्वाही महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मंगळवारी मनसेच्या शिष्टमंडळाला दिली.
बालभारती ते पौड रस्त्याला महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनेने विरोध केला आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. या वेळी मनसेचे सरचिटणीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनेचे अध्यक्ष हेमंत संभूस, सरचिटणीस अनिल राणे, उपाध्यक्ष विशाल शिंदे उपस्थित होते.
आणखी वाचा- पुणे: वाहन चालवण्याच्या परवान्याचा ‘स्मार्ट’ खोळंबा
या रस्त्याला २५० कोटींहून अधिक खर्च येणार असून जवळपास १४०० झाडे कापली जाणार आहेत. या पर्यायी रस्त्यामुळे चिपळूणकर रस्त्यावरील (विधी महाविद्यालय रस्ता) वाहतूक कमी होईलच, ही बाब महापालिकेने केलेल्या अनेक अहवालांमधूनही स्पष्ट होत नाही. त्यामुळे उपलब्ध सोयीसुविधा व त्यांच्या विस्ताराची मर्यादा लक्षात घेऊन जमीन वापराचा आराखडा असलेला पुण्याचा शहर विकास आऱाखडा पूर्ण करण्यात यावा, त्यानुसार वाहतुकीचा अंदाज घेऊन मगच कोट्यवधी रुपयांच्या पायाभूत सुविधांचे नियोजन व्हावे. हे संपूर्ण नियोजन नागरिकांसाठी खुले असावे. तोवर बालभारती ते पौड रस्ता जोडणाऱ्या टेकडीवरील या रस्त्याचा विचार करू नये, असे मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी सांगितले.
दरम्यान, हा रस्ता उन्नत असणार असून या रस्त्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा दोन दिवसांत नागरिकांसाठी खुला करण्यात येईल. या प्रकल्पाची माहिती, तज्ज्ञांचे अभिप्राय महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याची ग्वाही महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिल्याचेही संभूस यांनी सांगितले.