विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य निर्माण करणारी स्टेट इन्स्टिटय़ूट ऑफ एज्युकेशन टेक्नॉलॉजी (बालचित्रवाणी) ही संस्था महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळामध्ये (बालभारती) समाविष्ट करण्याचा निर्णय शुक्रवारी झाला असल्याची माहिती, शिक्षण विभागातील सूत्रांकडून मिळाली आहे. या एकत्रीकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित होणार आहेत.
बालचित्रवाणी आणि बालभारती एकत्र करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता, त्यावर शुक्रवारी शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. या निर्णयामुळे बालचित्रवाणी बंद होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. बालचित्रवाणी बालभारतीमध्ये समाविष्ट झाल्यास बालचित्रवाणीमधील कर्मचाऱ्यांचे पुढे काय होणार, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. काही महिन्यांपूर्वीच शिक्षण विभागामध्ये एकूण आठ पूर्ण वेळ संचालकांची नियुक्ती करण्यात आली होती. शासनाने शिक्षण आयुक्त पद तयार करून त्याचवेळी बालचित्रवाणीचे संचालक पद रद्द केले आहे. त्यामुळे संचालक मंडळावर एक संचालक पद अतिरिक्त होणार आहे.
दोन्हीही संस्थांची कामे एकमेकाला पूरक असली तरी वेगळी आहेत. बालभारती अभ्यासक्रम आणि पाठय़पुस्तके तयार करते, तर बालचित्रवाणीमध्ये अभ्यासक्रमांवर आधारित व्हिडीओ आणि ऑडिओ सीडीज, दूचित्रवाणीवरील कार्यक्रम अशा अभ्यासक्रमाला पूरक असणाऱ्या साहित्याची निर्मिती होते. पण गेल्या काही वर्षांमध्ये पुरेशा निधीअभावी पुरेशा साहित्याची निर्मिती झाली नाही. बालचित्रवाणी बालभारतीमध्ये समाविष्ट झाल्यावर बालभारतीच दृकश्राव्य साहित्याची निर्मिती करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा