संगीत रंगभूमीचे अनभिषिक्त नटसम्राट नारायणराव राजहंस ऊर्फ बालगंधर्व यांच्यावरील चरित्रात्मक पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला येत आहे. बालगंधर्व यांचे बंधू बापूकाका राजहंस यांनी आठवणींचा अनुबंध उलगडला असून हे बालगंधर्व यांचे अधिकृत चरित्र असल्याचा दावा करण्यात आला आहे.
बापूकाका राजहंस यांनी फुलस्केप कागदावर २०० पृष्ठांच्या दोन वह्य़ांमध्ये बालगंधर्व यांच्या आठवणी लिहून ठेवलेल्या होत्या. या वह्य़ा बापूकाकांचे स्नेही असलेल्या मुंबई येथील दसनूरकर दांपत्याकडे होत्या. अनुबंध प्रकाशनने प्रकाशित केलेल्या ‘ब्रीद तुझे दीनानाथा’ या मा. दीनानाथ यांच्या चरित्रात्मक पुस्तक प्रकाशनाच्या बातम्या वाचल्यानंतर सुमती दसनूरकर यांना बापूकाकांच्या लेखनाची आठवण झाली. त्यांनी डॉ. माधवी वैद्य यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी हे लेखन वाचल्यानंतर या पुस्तकाच्या संपादनाची जबाबदारी स्वीकारली. या पुस्तकासाठी बापूकाका यांची कन्या नीलांबरी बोरकर यांची लेखी परवानगी घेण्यात आली आहे. ऑगस्टमध्ये हे पुस्तक वाचकांच्या हाती येईल, अशी माहिती प्रकाशक अनिल कुलकर्णी यांनी दिली.
राजहंस कुटुंब हे मूळचे आटपाडीजवळील नागठाणे या गावचे. बालगंधर्व यांच्यासह भावंडे शिक्षणासाठी पुण्यात कशी आली याचा बापूकाकांनी ऊहापोह केला आहे. गंधर्व नाटक कंपनीचा इतिहास, प्रत्येक संगीत नाटक कसे घडले याची माहिती या पुस्तकातून मिळते, असे सांगून अनिल कुलकर्णी म्हणाले, कंपनीचा हिशेब पाहण्याचे काम बापूकाका करायचे. त्यामुळे कंपनी चालविण्यासाठी आर्थिक अडचणींवर मात करण्याचे कठीण काम त्यांनी केले. बालगंधर्व यांच्या जीवनामध्ये गोहरबाई यांचा प्रवेश झाल्यानंतर बापूकाकांनी कंपनी सोडली. त्यानंतर गंधर्व नाटक कंपनी आर्थिक डबघाईला आली. याविषयीचा इतिहास या लेखनातून उलगडला गेला आहे. यापूर्वी बालगंधर्व हे संगीत रंगभूमीवरील गायक-नट कसे होते किंवा गंधर्व नाटक कंपनीचे वेगळेपण याविषयी विपुल लेखन झाले आहे. मात्र, कुटुंबातील भावाने उलगडलेला आठवणींचा पट हे या पुस्तकाचे वैशिष्टय़ ठरले आहे. त्यामुळे हे पुस्तक म्हणजे बालगंधर्वाचे अधिकृत चरित्र आहे असे म्हणता येईल.
बालगंधर्व यांच्यावरील चरित्रात्मक पुस्तक वाचकांच्या भेटीला
या पुस्तकासाठी बापूकाका यांची कन्या नीलांबरी बोरकर यांची लेखी परवानगी घेण्यात आली आहे. ऑगस्टमध्ये हे पुस्तक वाचकांच्या हाती येईल, अशी माहिती प्रकाशक अनिल कुलकर्णी यांनी दिली.
आणखी वाचा
First published on: 26-06-2014 at 03:25 IST
TOPICSबायोग्राफी
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balgandharva biography musical play