पुण्यनगरीचे भूषण असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचे उपाहारगृह (कॅफेटेरिया) हा रंगकर्मीसह नाटय़प्रेमी रसिकांच्या जिव्हाळय़ाचा विषय आहे. हे उपाहारगृह चालविण्याची ठेकेदारी आता संपुष्टात येत आहे. ती पुन्हा मिळविण्याची मनीषा असलेल्या सध्याच्या ठेकेदाराला थकबाकी भरण्याशिवाय पर्यायच उरला नाही. यानिमित्ताने का होईना महापालिकेच्या तिजोरीमध्ये ११ लाख रुपयांची भर पडली आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीने मे २०११ मध्ये ठेकेदाराला उपाहारगृह चालविण्यासाठी दिले होते. त्याच्याकडून जून २०११ ते सप्टेंबर २०१२ या कालावधीत उपाहारगृहाच्या भाडय़ापोटी दरमहा १ लाख २९ हजार ९९८ रुपये याप्रमाणे २० लाख ७९ हजार ९८६ रुपये एवढा भरणा करणे अपेक्षित होते. मात्र, संबंधित ठेकेदाराने दरमहा ६४ हजार ३३० रुपये या जुन्या दराप्रमाणे ८ लाख ३६ हजार २९० रुपये रकमेचा भरणा केला. या प्रकरणामध्ये ठेकेदाराकडून १२ लाख ४३ हजार ६७७ रुपये थकीत असल्याचे आढळून आले. यामध्ये ठेकेदारावर आणि वाहनतळ चालविणाऱ्या ठेकेदारावर मेहेरनजर केल्याचा ठपका ठेवून रंगमंदिराच्या तत्कालीन व्यवस्थापकावर महापालिकेने निलंबनाची कारवाई केली होती.
आता या उपाहारगृहाच्या ठेकेदारीची मुदत वर्षअखेरीस समाप्त होत आहे. महापालिका नियमानुसार नव्याने ठेका संपादन करण्यासाठी ज्या तिघांनी निविदा सादर केल्या आहेत त्यामध्ये सध्याच्या ठेकेदाराचाही समावेश आहे. दरमहा १ लाख ७७ हजार ६८७ हा दर एका ठेकेदाराने दिला आहे. दुसऱ्याने १ लाख ७१ हजार १११ रुपये, तर तिसऱ्याने १ लाख ५८ हजार २०० रुपये हा दर निविदेमध्ये भरला आहे. मात्र, ही निविदा भरण्यापूर्वी थकबाकी भरण्याची प्रक्रिया या जुन्या ठेकेदाराला पूर्ण करावी लागली. १५ डिसेंबर आणि ११ नोव्हेंबर अशा दोन तारखांना मिळून या ठेकेदाराने ही थकबाकी भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. आता या विषयावर स्थायी समिती निर्णय घेणार आहे. थकबाकी भरल्यानंतरही उपाहारगृहाचा ठेका पुन्हा मिळेल की नव्या वर्षांत नाटय़प्रेमींना नव्या ठेकेदाराने दिलेल्या खाद्यपदार्थाची चव चाखायला मिळणार याचे उत्तर मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल.
बालगंधर्व उपाहारगृहाची ११ लाखांची थकबाकी वसूल
बालगंधर्व रंगमंदिराचे उपाहारगृह (कॅफेटेरिया) हा रंगकर्मीसह नाटय़प्रेमी रसिकांच्या जिव्हाळय़ाचा विषय आहे. हे उपाहारगृह चालविण्याची ठेकेदारी आता संपुष्टात येत आहे.
First published on: 26-12-2013 at 02:50 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balgandharva cafeteria pmc contract