पुणे : पालखी सोहळ्यात खासगी चित्रीकरणासाठी ड्रोन कॅमेऱ्याच्या वापरास बंदी घालण्यात आली आहे. खासगी चित्रीकरणासाठी पोलिसांकडून परवानगी मिळवणे आवश्यक असून बेकायदा चित्रीकरण केल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने राज्याच्या वेगवेगळ्या भागातून वारकरी सहभागी होतात. काहीजण ड्रोन कॅमेऱ्याच्या वापर करुन पालखी सोहळ्याचे चित्रीकरण करतात. पोलीस परवानगी शिवाय ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण मनाई करण्यात आली आहे. ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करण्यासाठी पोलिस परवानगी आवश्यक असून त्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यात परवानगी अर्ज करावा लागणार आहे. पोलिसांचे आदेश २५ जून पर्यंत लागू राहणार आहेत, असे सहायक पोलीस आयुक्त आर. एन. राजे यांनी कळविले आहे.

संभाव्य घातपाती कारवाया तसेच ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरणाचा दुरुपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलीस परवानगी शिवाय ड्रोन कॅमेऱ्यांनी चित्रीकरण केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा राजे यांनी दिला आहे.

Story img Loader