पिंपरीः अलीकडे अतिशय घाणेरड्या पद्धतीने सादर होणाऱ्या लावण्यांवर बंदी घातली पाहिजे ‘ अशी मागणी लावणीसम्राज्ञी शकुंतला नगरकर- काळे यांनी केली. या वाढत्या प्रकारांमुळे लावणी ही लोककला बदनाम होऊ लागली आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पिंपरी-चिंचवड कलाकार संघाच्या वतीने यंदाचा ‘जीवन गौरव’ पुरस्कार स्वीकारल्यानंतर सत्काराला उत्तर देताना शकुंतला नगरकर म्हणाल्या की, लावणी सादर करताना पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत शरीर झाकलेले असते. सध्या चित्रविचित्र कपडे घालून आक्षेपार्ह पद्धतीने लावणी सादर केली जाते, ही चिंतेची बाब आहे. अशा सादरीकरणाला रसिकांनी प्रतिसाद देऊ नये. खऱ्या लावणीला जपण्याची; तसेच खऱ्या कलावंताना रसिकांनी प्रेम देण्याची गरज आहे.
हेही वाचा >>> पुणे : राहुल गांधीच्या त्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ शहरात भाजपच्या वतीने आंदोलन
हेही वाचा >>> पुणे : लोणी काळभोरमध्ये पेट्रोल चोरट्यांच्या अड्ड्यावर छापा; ८० लाखांच्या मुद्देमालासह सात जणांना अटक
अभिनेत्री सुरेखा कुडची म्हणाल्या की, केवळ अंगप्रदर्शन केले म्हणजे गाणे उत्कृष्ट होत नाही, पूर्ण अंग झाकूनही गाण्यातील भाव उत्कृष्टपणे मांडता येतात. घाणेरडे हातवारे, पेहराव करण्याची काहीही गरज नाही. प्रेक्षकांनी लावणीतील सौंदर्य पाहणे गरजेचे आहे. मेघराज राजेभोसले म्हणाले की, लोककला जपणाऱ्यांचा हा सन्मान आहे. कलाकारांनी उद्योग, व्यवसायातही आले पाहिजे व बचतीची सवय लावली पाहिजे. यावेळी जयमाला इनामदार, अनिल गुंजाळ, भाऊसाहेब भोईर, श्रावणी चव्हाण, विजय उलपे आदी पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक विजय उलपे यांनी केले. सूत्रसंचालन चित्रसेन भवार यांनी केले. के. डी. कड यांनी आभार मानले.