आकाशात प्रखर प्रकाश सोडलेल्या दिव्यांचा त्रास होत असल्याच्या तक्रारी वैमानिकांनी केल्यानंतर लोहगाव विमानतळ परिसरात १५ किलोमीटर परिघामध्ये रात्री आकाशात प्रकाशझोत सोडणारे दिवे (बीमलाईट) लावण्यास पुणे पोलिसांनी बंदी घातली आहे. तरीही शहरातील अनेक भागात रात्री सर्रासपणे असे प्रखर दिवे लावले जात असून, रविवारी आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकांमध्येही त्यांचा मोठय़ा प्रमाणात वापर पाहायला मिळाला. त्यामुळे या दिव्यांच्या बंदीचा पुणे पोलिसांचा आदेश नावापुरताच आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
लोहगाव विमानतळावर रात्री उतरणाऱ्या विमानांना परिसरात आकाशाच्या दिशेने लावणाऱ्या प्रखर प्रकाशझोतामुळे अडचणी निर्माण होत असल्याची तक्रार भारतीय वायुसेनेच्या काही पायलटनी केली होती. विमानतळ प्रशासनाने पुणे पोलीस आयुक्तालयाकडे ही तक्रार केली. त्यानुसार मार्च महिन्यात पुणे पोलिसांनी नोटीस काढून लोहगाव विमानतळ परिसरापासून पंधरा किलोमीटर परिघामध्ये प्रखर दिव्यांना बंदीचा आदेश काढला होता. याबाबत मॉल, हॉटेल यांना असे दिवे काढून टाकण्याच्या आणि यापुढे न लावण्याच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या. प्रखर दिवे बंद करण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या होत्या. विमानतळापासून पंधरा किलोमीटर परिघामध्ये हडपसर, बिबवेवाडी, डहाणूकर कॉलनी, औंध, पिंपरीपर्यंतचा म्हणजे जवळजवळ संपूर्ण पुण्याचा परिसरच बंदीच्या क्षेत्रात येतो.
ही बंदी असली तरी शहरात अनेक भागात सर्रासपणे रात्री असे दिवे झळकवले जातात. गेल्याच रविवारी आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत दापोडी, बोपोडी, येरवडा, खडकी परिसरात रात्री असे दिवे मोठय़ा प्रमाणात दिसले. त्यामुळे पोलिसांनी घातलेली बंदी केवळ नावापुरती आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या दिव्यांचा त्रास होत असल्याच्या तक्रारी वायुसेनेच्या वैमानिकांनी केल्या असूनही त्या पोलिसांनी गांभीर्याने घेतलेल्या दिसत नाही.

‘बंदी आहे; कारवाई करू’
याबाबत विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त एम. टी. तांबडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आकाशात प्रखर प्रकाश सोडणाऱ्या दिव्यांना बंदीच आहे. शहरात असे दिवे सुरू असतील तर त्या भागातील पोलीस निरीक्षकांना सूचना दिल्या जातील. दिवे सुरू ठेवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.