लोहगाव विमानतळ परिसरात १५ किलोमीटर परिघामध्ये रात्री आकाशात प्रकाशझोत सोडणारे दिवे (बीमलाईट) लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे विमानतळापासून हडपसर, बिबवेवाडी, डहाणूकर कॉलनी, औंध, पिंपरीपर्यंतच्या सर्वच ठिकाणी असे दिवे वापरता येणार नाहीत. वायुसेनेच्या काही पायलटनी विमानतळ प्रशासनाकडे तक्रारी केल्यानंतर पोलीस आयुक्तालयाकडून हा आदेश काढण्यात आला आहे. 
लोहगाव विमानतळावर रात्री देश-परदेशातून अनेक विमानांची ये-जा सुरू असते. त्याच बरोबर भारतीय हवाई दलाची अनेक विमाने उतरत असतात. रात्री लोहगाव विमानतळावर उतरणाऱ्या विमानांना परिसरात आकाशाच्या दिशेने लावणाऱ्या प्रखर प्रकाशझोतामुळे अडचणी निर्माण होत असल्याची तक्रार भारतीय वायुसेनेच्या काही पायलटनी केली होती. विमानतळ प्रशासनाने पुणे पोलीस आयुक्तालयाकडे ही तक्रार केली. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून या भागात प्रखर दिव्यांना बंदी घालण्यात आली आहे. याबाबत मॉल, हॉटेल यांना असे दिवे काढून टाकण्याच्या आणि यापुढे न लावण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. मुंढवा भागातील काही हॉटलमध्ये अशा प्रकारचे दिवे लावण्यात आले होते. ते काढण्यात आले आहेत. मिरवणूक, कार्यक्रमांच्या वेळीही असे दिवे लावता येणार नाहीत. पुणे शहराचा विचार करता हडपसर, बिबवेवाडी, डहाणूकर कॉलनी, औंध, पिंपरी अशी सर्वच ठिकाणी विमानतळापासून साधारणत: १५ किलोमीटरच्या टप्प्यात येतात. त्यामुळे ही बंदी संपूर्ण शहरासाठीच लागू असेल.
याबाबत विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त एम. टी. तांबडे यांनी सांगितले की, लोहगाव विमानतळ परिसरात आकाशात मोठे ‘बीमलाईट’ लावल्यामुळे उंचीपर्यंत प्रकाशझोत जातो. त्यामुळे विमान उतरत असताना पायलटची दिशाभूल होऊन अपघात घडण्याची शक्यता असते. काही पायलटनी याबाबत विमानतळ प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार विमानतळ परिघामध्ये पंधरा किलोमीटपर्यंत असे प्रखर दिवे लवण्यास बंदी घालण्यात आली आहे. काही हॉटेल, मिरवणूक, काही कार्यक्रमांना असे दिवे लावले जात होते. ते काढण्यात आले आहेत. यापुढे अशा दिव्यांना परवानगी देण्यात येऊ नये, अशा सूचना देण्यात आल्याचे तांबडे यांनी सांगितले.
याबाबत वायुसेनेचे प्रवक्ते विंग कमांडर आर. आर. लाल यांनी सांगितले की, एका महिन्यापूर्वी पुणे पोलिसांना तक्रारीचे पत्र देण्यात आले होते. उत्सव, पार्टी, मिरवणुकीच्या वेळी आकाशाकडे प्रखर प्रकाशझोत असलेल्या दिव्यांचा पायलटना त्रास होतो. वायुसेनेच्या दोन पायलटनी याबाबत तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार याबाबत पुणे पोलिसांना कळविण्यात आले होते.