पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त शहरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. पुढील दोन दिवस शहरात ड्रोन, पॅराग्लायडर, हलकी विमाने (लाइट एअर क्राफ्ट) वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. सहपोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी याबाबतचे आदेश दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. सोमवारी (२९ एप्रिल) लष्कर भागातील रेसकोर्स येथे मोदींची सभा होणार आहे. मंगळवारी (३० एप्रिल) मोदी सोलापूरला जाणार आहेत. संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे. रेसकोर्स मैदान आणि शिवाजीनगर येथे हॅलीपेड तयार करण्यात येणार आहे. पंतप्रधानाचे वास्तव्य, तसेच ज्या मार्गाने त्यांचा ताफा जाणार आहे. तेथे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. रविवारी मध्यरात्रीपासून पुढील दोन दिवस शहरातील ड्रोन कॅमेऱ्यांच्या वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. पोलिसांव्यतिरिक्त अन्य खासगी संस्थांना ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करायचा असेल तर त्यांनी विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्तांची परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. परवानगी शिवाय ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा सहपोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिला आहे.
शहर तसेच उपनगरात मंगळवारपर्यंत (३० एप्रिल) ड्रोन, पॅराग्लायडर, लाइट एअरक्राफ्ट (हलकी विमाने), तसेच दूरसंवेदकाद्वारे नियंत्रित करणारी विमाने वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे, असे सहपोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.