पुणे : बारा ज्योर्तिलिंगांपैकी पुणे जिल्ह्यातील एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे सध्या भाविकांची मोठी गर्दी होत आहे. अधिक श्रावण महिना सुरू असल्यामुळे ही गर्दी होत आहे. त्यानंतर सुरू होणाऱ्या श्रावणात ही गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंदिर परिसरात मोबाइल वापराला बंदी घालण्यात आली आहे.
श्रावणात सुरक्षिततेच्या दृष्टीने गाभारा, मुख्य मंडप आणि मंदिर परिसरामध्ये गर्दी होऊन भाविकांची गैरसोय होऊ नये, दर्शन सुलभतेने व्हावे, तसेच कुठलीही अनुचित घटना घडू नये आणि मंदिराचे पावित्र राखले जावे यासाठी मोबाइल वापरास, छायाचित्र काढणे किंवा चित्रफित काढण्यास बंदी करण्यात आली आहे. भाविकांनी गाभारा, मुख्य मंडप आणि मंदिर परिसरात छायाचित्रे काढू नयेत, तसेच मोबाइल बंद ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
या आवाहनानंतरही मंदिर परिसरात मोबाइल वापरताना किंवा छायाचित्र काढताना आढळल्यास मंदिर संस्थानाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही मंदिर संस्थानकडून कळविण्यात आले आहे.