महात्मा गांधी यांच्या अहिंसावादामुळे नाहीतर क्रांतिकारकांमुळे स्वातंत्र्य मिळाले आहे. महात्मा गांधींचा अहिंसावाद आणि हिंदुत्व हे दोन्ही पक्षपाती आहेत, असे वादग्रस्त विधान बंडातात्या कराडकर यांनी पुण्याच्या खेडमध्ये केले आहे. क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे हुतात्मा गेले त्या शहीद दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानादरम्यान बंडातात्या बोलत होते. आपल्या भाषणामध्ये महात्मा गांधींच्या कार्याचा उल्लेख करताना वाद निर्माण होतील अशी विधानं केली आहेत.
नक्की वाचा >> “इस्लाम हा देशाचा खरा शत्रू आहे, संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहून…”; संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य
“भगतसिंग यांनी केलेली क्रांती अभूतपूर्व आहे. सुरुवातीला त्यांच्या मनामध्ये महात्मा गांधींची छाप होती. महात्मा गांधींच्या अहिंसावादी धोरणाची भगतसिंग यांच्या मनावर छाप होती. आपल्याला हे स्वातंत्र्य अहिंसक मार्गाने मिळवायच आहे, असं भगतसिंग यांना वाटायचे. पण, भगतसिंगाच्या भ्रमाचा भोपळा तीन वर्षांमध्ये फुटला,” असं बंडातात्या यांनी म्हटलंय. “१९२२ ला एक हत्याकांड झालं. त्या हत्याकांडात समर्थन देण्यासाठी म्हणून महात्मा गांधींनी नकार दिला. तेव्हा, भगतसिंग हे महात्मा गांधींवर नाराज झाले. महात्मा गांधींच्या अहिंसावाद आणि महात्मा गांधी यांचं हिंदुत्व हे दोन्ही पक्षपाती आहेत,” असं विधान बंडातात्या यांनी हे उदाहरण देत म्हटलंय.
नक्की वाचा >> डॉक्टरांबद्दल संभाजी भिडेंचं वादग्रस्त विधान; अपशब्दांचा वापर करत म्हणाले, “डॉक्टर आपटून…”
“भगतसिंग यांच्या मनावर परिणाम झाला की या म्हाताऱ्याच्या (महात्मा गांधी) मार्गाने जाण्याचे कारण नाही. ते त्यानंतर क्रांतिकारक बनले. लोकमान्य टिळक यांचं एक वाक्य आहे, की म्हाताऱ्याच्या (महात्मा गांधी) पद्धतीने स्वराज्य मिळवायचं असेल ना भारत स्वातंत्र्य व्हायला एक हजार वर्षे लागतील. १९४७ ला जे स्वातंत्र्य मिळालं ते अहिंसेने मिळालेले नाही. १९४२ ला क्रांतिकारकांची चळवळ उभी राहिली, चले जाव चळवळ! या चळवळीमध्ये गावोगावी पोलीस स्थानके जाळणे, रेल्वे रूळ उखडणे, सरकारी कचेऱ्या जाळणं या घटना घडत गेल्या. त्याचा बोध इंग्रजांनी घेतला की, आता हा देश सोडण्याशिवाय पर्याय नाही,” असं बंडातात्या म्हणाले.
“साबरमती के संत तुने कर दिया कमाल… दे दी हमें आझादी खडक बिना ढाल… असं म्हटलं जातं. हे साडेतीनशे लोकांनी आहुत्या दिल्यात, त्यांच्या क्रांतीचा अपमान केल्यासारखं आहे,” असं म्हणत बंडातात्यांनी महात्मा गांधीच्या योगदानाबद्दल भाष्य केलंय.