टाळगाव-चिखली येथे पिंपरी महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणारे संतपीठ हा स्तुत्य उपक्रम आहे. संतपीठाची उभारणी करणारी पिंपरी-चिंचवड ही पहिली महापालिका आहे, त्याचे अनुकरण इतरांनी करावे, असे आवाहन करत संतपीठाच्या कामात कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप नको आहे, अशी स्पष्ट भूमिका ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी मांडली. पैठण व पंढरपूरचे प्रलंबित संतपीठाचे विषय राज्य शासनाने मार्गी लावावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
संतपीठासंदर्भात चर्चा करण्यासाठी पालिका मुख्यालयात डॉ. सदानंद मोरे, बंडातात्या कराडकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. वा. ना. अभ्यंकर, आमदार महेश लांडगे, आयुक्त राजीव जाधव, अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, स्थायी समितीचे अध्यक्ष अतुल शितोळे, पक्षनेत्या मंगला कदम, शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे, चिखलीचे नगरसेवक दत्ता साने, स्वाती साने आदी उपस्थित होते. दीड तास चाललेल्या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती देण्यात आली.
कराडकर म्हणाले,‘संतपीठाच्या माध्यमातून वारकरी सांप्रदायाला अधिकृत व्यासपीठ मिळणार आहे. समाजाच्या शुध्दीकरणाचे हे पहिले पाऊल आहे. पिंपरी पालिका संतपीठ उभारू शकते, त्याच पध्दतीने राज्यशासनाने पैठण व पंढरपूरचे प्रलंबित संतपीठ मार्गी लावावे.’ डॉ. मोरे म्हणाले,‘संतपीठाचा संकल्प मोठा आहे. पहिल्या बैठकीत चांगली सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रात संतपरंपरेचा पाया बळकट आहे. संतांच्या शिकवणुकीचा आधार घेतल्यास सर्वाना उपयोग होईल.’ आयुक्तांनी प्रशासकीय पातळीवरील तयारीची माहिती दिली.
अाध्यात्मिक यशदा केंद्र
अध्यात्मिक शहर होण्याचे दृष्टीने संतपीठ हे महत्त्वाचे पाऊल आहे. संतपीठासाठी पाच एकर जागेचे नियोजन असून त्यामध्ये शाळा, ग्रंथालय, संशोधनकेंद्र होणार असून यशदाच्या धर्तीवर हे ‘अध्यात्मिक यशदा केंद्र’ करण्याचा प्रयत्न आहे.
– राजीव जाधव, आयुक्त

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा