पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने खासगी विमा कंपनीतील व्यवस्थापकाची एक कोटी १९ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी बाणेर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी शिवाजी गजानन शिंदे (वय ३९, रा. डीएसके विद्यानगर, पाषाण-सूस रस्ता), मधुरा रोहन नंदुर्गी (वय ३५, रा. वाकड), रवींद्र नायडू (वय ३७) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत खासगी विमा कंपनीतील व्यवस्थापकांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटू देऊ नका; अजित पवारांच्या आमदारांच्या वक्तव्याने खळबळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिंदे आणि तक्रारदार व्यवस्थापक ओळखीचे आहेत. दोघांंचे मूळगाव एक आहे. शिंदे याची बाणेर भागात क्रिप्सिका ॲकडमिक सर्व्हिसेस कंपनी आहे. आमची कंपनी शैक्षणिक क्षेत्रात काम करते, असे त्याने तक्रारदाराला सांगितले होते. त्यानंतर शिंदे याने त्यांना २०२१ मध्ये कंपनीच्या कार्यालयात बोलावून घेतले. त्यावेळी शिंदे याचे सहकारी नंदुर्गी आणि नायडू तेथे होते. शिंदे याने त्यांना गुंतवणूक योजनांची माहिती दिली. गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष त्याने दाखविले. त्यानंतर तक्रारदार व्यवस्थापकाने स्वत:कडील, तसेच नातेवाईकांकडून रक्कम घेऊन शिंदे याला गुंतवणुकीस दिली.

हेही वाचा >>> पुण्यात साकारला अनोखा विश्वविक्रम…

सुरुवातीला शिंदेने त्यांना परताव्यापोटी काही रक्कम दिली. त्यानंतर रक्कम देणे बंद केले. त्यांनी शिंदे याच्याकडे विचारणा केली. तेव्हा त्याने कंपनीचे संचालकपद त्यांना दिले. काही दिवसांनी त्याने कंपनीचे कार्यालय बंंद केले. गुंतवणूक केलेल्या पैशांबाबत विचारणा केली. तेव्हा शिंदेने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. राजकीय नेते, पोलीस अधिकाऱ्यांशी ओळख असल्याची बतावणी त्याने केली. पैशांची मागणी केल्यानंतर शिंदे याने खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली, तसेच आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचे तक्रारादाराने फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baner police files case against three for cheating insurance company manager over rs 1 crore pune print news rbk 25 zws