पुणे : बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी तरुणाला भारती विद्यापीठ पोलिसांनी पकडले. याप्रकरणी रियाजूल मामरुल मुल्ला (वय २५, सध्या रा. आंबेगाव खुर्द) याच्याविरुद्ध परकीय नागरिक कायदा कलम १४, तसेच पारपत्र अधिनियम, परकीय नागरिक आदेश कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार रवींद्र चिप्पा यांनी याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुल्ला मूळचा बांगलादेशी आहे. तो कात्रज भागातील आंबेगाव खुर्द परिसरात बेकायदा वास्तव्य करत होता. याबाबतची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांच्या तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला आंबेगाव खुर्द परिसरातून शनिवारी ताब्यात घेतले. रात्री उशीरा त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे तपास करत आहेत.

मुल्लाने भारतात घुसखोरी कशी केली, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. अभिनेता सैफ अली खान याच्यावर मुंबईत बांगलादेशी तरुणाने हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले होते. पिंपरी-चिंचवड परिसरात, स्वारगेट भागातील महर्षीनगर परिसरातून बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली होती.

Story img Loader