लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : बांगलादेशी घुसखोर तरुणीला बंडगार्डन पोलिसांनी ताब्यात घेतले. पुणे रेल्वे स्थानक परिसरात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी मुसलमिया अब्दुल अजीज प्यादा (वय २७, रा. पश्चिम कोलागासिया, आमतुली, जि. बोरगुना, बांगलादेश) हिला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत पोलीस शिपाई भाग्यश्री सागर यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मुसलमिया मंगळवारी सायंकाळी पुणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक सहाजवळ असलेल्या रिक्षाथांब्याजवळ थांबली होती. गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाला संशय आल्याने तिची चौकशी करण्यात आली. तेव्हा ती बांगलादेशातून आल्याची माहिती मिळाली. तिच्याकडे पारपत्र, तसेच भारतात प्रवेश करण्याबाबतची अधिकृत कागदपत्रे नव्हती. दलालाच्या मध्यस्थीने तिने भारतात बेकायदा प्रवेश केल्याचे उघडकीस आले.
आणखी वाचा-मंचर परिसरात २५० किलो भांगमिश्रीत गोळ्या जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
त्यानंतर पोलिसांनी तिच्याविरुद्ध पारपत्र कायदा, तसेच परकीय नागरिक आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गु्न्हा दाखल करण्यात आला. मुसलमियाने भारतात का प्रवेश केला? तसेच तिला पुण्यात कोणी आणले, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक मुजावर तपास करत आहेत.
वर्षभरापूर्वी बुधवार पेठेतील वेश्यावस्तीतून बांगलादेशी महिलांसह दलालांना ताब्यात घेण्यात आले होते, तसेच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कारवाई केली होती. बांगलादेशी तरुणींना नोकरीचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायास प्रवृत्त केले जाते.
© The Indian Express (P) Ltd