पिंपरी : गोव्यातील पारपत्र कार्यालयातून बनावट कागदपत्रांद्वारे पारपत्र (पासपोर्ट) काढून पिंपरी-चिंचवड शहरात २० बांगलादेशी नागरिकांनी वास्तव्य केल्याचे उघडकीस आले आहे. त्यांची पारपत्रे गोव्यातील पारपत्र कार्यालयातून रद्द करण्यात आली आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात राहत असल्याची कागदपत्रे सादर करून आतापर्यंत ६४ बांगलादेशी नागरिकांनी पारपत्र काढल्याचे पोलीस तपासात निदर्शनास आले आहे.
सहायक पोलीस निरीक्षक अंबरिश देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२४ मध्ये निगडीतील साईनाथनगर परिसरातून चार बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. त्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे आधारकार्ड, पॅनकार्ड काढले होते. या आरोपींची टोळी असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी गोव्यातून पारपत्र काढले होते. १९ जणांनी सांगवीचा, तर एकाने पुण्यातील दत्तवाडी येथील पत्ता दिला होता. आरोपींचे पारपत्र पडताळणीसाठी सांगवी पोलिसांकडे आले होते. आरोपी बांगलादेशी असून, त्यांनी बनावट कागदपत्रे दिली आहेत. त्यामुळे या सर्वांचे पारपत्र रद्द करण्यात यावे, असे पत्र निगडी पोलिसांनी गोवा पारपत्र कार्यालयास जुलै २०२४ मध्ये दिले. त्यानुसार गोवा पारपत्र विभागाने या बांगलादेशी घुसखोरांचे पारपत्र रद्द केल्याचे पत्र निगडी पोलिसांना दोन दिवसांपूर्वी पाठविले आहे.
हेही वाचा >>>पिंपरी: हवा प्रदूषणावर आता ‘ग्रॅप’ची नजर; प्रदूषण करणारे उद्योग…
गोव्यातून पारपत्र का काढत होते?
गोव्यामध्ये परदेशी नागरिकांचा सतत राबता असतो. त्यामुळे गोवा कार्यालयातून पारपत्र मिळाल्यावर व्हिसा मिळविण्यात अडचणी येत नाहीत. त्यामुळे बांगलादेशी घुसखोर हे गोव्यातून पिंपरी-चिंचवडच्या पत्त्यावर पारपत्र काढत होते. आतापर्यंत शहरातून ६४ बांगलादेशी नागरिकांनी पारपत्र काढल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
हेही वाचा >>>हर्नियासह सहव्याधींनी ग्रस्त ज्येष्ठ महिलेवरील उपचारांचे आव्हान, दोन महिन्यांच्या प्रयत्नांनंतर यशस्वी
करारनाम्याच्या आधारे पारपत्र
बांगलादेशी नागरिक शहरात आल्यावर खोली भाड्याने घेत करारनामा करीत होते. त्या भाडे करारनाम्याच्या आधारे बँकेत खाते सुरू करत होते. बँकेतील खात्याचे पासबुक वापरून आधार कार्डवरील पत्त्यात बदल करीत होते. त्यानंतर बदललेल्या पत्त्यावरून पारपत्रासाठी अर्ज करत असल्याचे पोलीस चौकशीत निदर्शनास आले आहे.
२० बांगलादेशी नागरिकांचे पारपत्र रद्द केल्याचे गोवा कार्यालयाचे पत्र प्राप्त झाले आहे. त्यांपैकी चार जण जामिनावर बाहेर आहेत. १६ जण कोठे आहेत, याची माहिती घेण्यात येत असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक अंबरिश देशमुख यांनी सांगितले.