पुणे : बनावट चलनाच्या तपासात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका बँकेतील दोन कोटी रुपयांचा अपहार उघडकीस आणला आहे. बँकेतील रोकड अन्यत्र वळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या मंचरमधील एका बँकेच्या उपव्यवस्थापकासह तिघांना गुन्हे शाखेने अटक केली. या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सुशील सुरेश रावले (वय ३४, रा. मंचर ), अमोल गोरखनाथ कंचार ( वय ४५, रा. औरंगाबाद ) आणि संतोष वैजनाथ महाजन ( वय ४३, रा. वृंदावननगर, नाशिक) यांना अटक करण्यात आली आहे. ठाणे परिसरात दोन दिवसांपूर्वी आठ कोटी रुपयांच्या बनावट नोटा दोघांकडून जप्त करण्यात आल्या होत्या. या गुन्ह्याचे धागेदोरे पालघर परिसरात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. बनावट नोटा चलनात आणणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर राज्यभरातील पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या.
बनावट चलन वितरित करण्यासाठी टोळी लष्कर भागात येणार असल्याची माहिती मिळाली होती. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव, उपनिरीक्षक जयदीप पाटील, महेंद्र पवार, हरिष मोरे, संजय आढारी, सारस साळवी आदींनी लष्कर भागात सापळा लावला होता. तेव्हा मोटारीतून आलेल्या तिघांची पोलिसांनी संशयावरून चौकशी केली. मोटारीची पाहणी करण्यात आली, तेव्हा मोटारीत दोन कोटी रुपयांची रोकड सापडली. पंचासमक्ष रोकड जप्त करून आरोपीना ताब्यात घेण्यात आले.
संशयित आरोपी रावले आणि कंचार मावसभाऊ आहेत. रावले मंचर येथील एका बँकेच्या शाखेत चलन आदानप्रदान शाखेचा (करन्सी चेस्ट) उपव्यवस्थापक असून कंचार एका ट्रस्टचा प्रमुख आहे. ट्रस्टच्या माध्यमातून तो दोन कोटी रुपये महाजन याला देणगी देणार होता. त्यासाठी तीन कोटी रुपये छुप्या मार्गाने द्यायचे होते. या व्यवहारातील रकमेचा वाटा तिघेही वाटून घेणार होते. त्यासाठी रावले याने अधिकाराचा गैरवापर करून बँकेतील दोन कोटी रुपये काढले होते. प्रत्यक्षात ही रक्कम रिझर्व्ह बँकेने संबंधित बँकेच्या २६ शाखांमध्ये साठ्यासाठी पाठवली होती. रावलेसह तिघे आरोपी रोकड घेऊन मोटारीतून जात असताना पकडले गेले. तिघांना तपासासाठी मंचर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. आरोपींनी या स्वरूपाचे आणखी काही व्यवहार केले आहेत का ? आणखी कोणी सामील आहे का?, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. तिघांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.