आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर तापलेल्या राजकीय वातावरणात पिंपरी-चिंचवडच्या बडय़ा नेत्यांचे सलगपणे येणाऱ्या वाढदिवशी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांची जोरदार चढाओढ दिसून येत आहे. शुभेच्छांच्या जाहिराती व फलकबाजीचे प्रमुख चौकांमध्ये अघोषित युद्ध रंगले आहे.
फेब्रुवारी महिन्यातील काही वाढदिवस दरवर्षी दणक्यात साजरे होतात. यंदा त्याला लोकसभा निवडणुकांची पाश्र्वभूमी आहे. माजी महापौर आर. एस. कुमार यांचा १३ फेब्रुवारी, आमदार लक्ष्मण जगताप यांचा १५ फेब्रुवारी, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख श्रीरंग बारणे यांचा १६ फेब्रुवारीला वाढदिवस आहे. राष्ट्रवादीचे नेते आझम पानसरे यांचा १२ फेब्रुवारीला, भाजप नेते अमर साबळे यांचा ७ फेब्रुवारीला वाढदिवस झाला. याशिवाय, राजेंद्र साळुंके, जगदीश शेट्टी अशा अनेकांचा वाढदिवस याच महिन्यात येतात. मावळ लोकसभेच्या अनुषंगाने पानसरे, जगताप व बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून वृत्तपत्रांना रकानेच्या रकाने जाहिराती देण्यात आल्या आहेत. शहरातील सर्व प्रमुख चौकांमध्ये मोठे होर्डिग लावण्यात आले आहेत. लक्ष्मण जगताप व श्रीरंग बारणे यांच्याकडे मावळ लोकसभेचे प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जाते. यानिमित्ताने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यातूनच रंगलेले फलकयुद्ध नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लांडे दाम्पत्याचे भोसरीत शक्तिप्रदर्शन
आमदार विलास लांडे व महापौर मोहिनी लांडे यांचा मुलगा विक्रांत यांचा विवाह १७ फेब्रुवारीला भोसरीत संपन्न होत आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर राहत्या गावात हा सोहळा आयोजित करून हजारोंच्या उपस्थितीत अप्रत्यक्षपणे प्रचाराचा नारळच फोडण्याची व्यूहरचना असल्याचे मानले जाते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Banner war in pimpri