गुंड बापू नायर आणि त्याचा साथीदारांनी कोंढव्यातील एकाची जागा बळकावून त्याच्याकडे आठ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
बोपाडीत राहणाऱ्या एका तरुणाने याबाबत कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार गुंड बापू नायर, अभिजित नायर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर नायर याचे साथीदार संदीप बाळासाहेब नरोडे (वय ३४, रा.कात्रज), मिलिंद मारुती जगताप (वय ४४, रा. पर्वती दर्शन), झिया अहमद बागवान (वय २५, रा.कात्रज )यांना अटक करण्यात आली.
कोंढव्यात तक्रारदार तरुणाची जागा आहे. ही जागा गुंड नायर आणि त्याच्या साथीदारांनी बळकाविली. तेथे पत्र्याचे शेड उभारले. तक्रारदार तरुणाला ही माहिती समजली. तो जागेची पाहणी करण्यासाठी गेला. तेव्हा नायर आणि त्याचा साथीदारांनी त्याला धमकाविले. जागेचा ताबा सोडण्यासाठी आठ लाख रुपयांची खंडणी मागितली. घाबरलेल्या तरुणाने पोलीसांकडे तक्रार दिली. नायर याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली. नायर पसार झाला आहे. अशाच पद्धतीने नायर टोळीने मार्केट यार्डमधील एका व्यावसायिकाची जागा बळकाविली असून त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जागा बळकाविण्याचा हा नायर टोळीविरुद्ध दाखल झालेला दुसरा गुन्हा आहे. पोलिस उपनिरीक्षक नितीन अतकरे तपास करत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा