लोकसत्ता वार्ताहर

बारामती: अभ्यास दौऱ्यासाठी बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे शिष्टमंडळ काश्मीर परिसरात अडकले आहे. नुकत्याच झालेल्या गोळीबार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर या शिष्टमंडळाला तत्काळ बारामतीत आणण्यासाठी गुरुवारी (दि २४) रोजी बारामतीच्या दौऱ्यावर असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली आहे.

बारामतीतील दूध संघाचे शिष्टमंडळ काश्मीर येथील अभ्यास दौऱ्यावर आहे. मात्र, मंगळवारी काश्मीर मधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर काश्मीर परिसरात अडकले आहे. गुरुवारी (दि २४) रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अडकलेल्या शिष्टमंडळाशी संपर्क साधला. तसेच केंद्रीय नागरी विमान वाहतुक राज्यमंत्री मोहोळ यांच्याशीही याबाबत चर्चा केली. आपल्या भागात येणाऱ्या नागरिकांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयाशी तर विमानाने येणाऱ्या नागरिकांनी मंत्री मोहोळ यांच्या कार्याशी संपर्क साधावा.

काश्मीरमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी मुंबईत रात्रदिवस खासगी सचिवांची नियुक्ती करण्यात आल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, पवार यांच्या सूचनेनंतर आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून दर दोन तासांनी अडकलेल्या नागरिकांच्या परतीच्या प्रवासाची माहिती घेण्यात येत आहे.