Baramati Father Killed 9 year old son : बारामती तालुक्यातील होळ येथील पियुष विजय भंडलकर या नऊ वर्षीय मुलाचा त्याच्याच वडिलांनी खून केला आहे. विजय भंडलकर याने त्याचा मुलगा पियुष हा अभ्यास करत नाही म्हणून रागाच्या भरात त्याचं डोकं भिंतीवर आपटून आणि गळा दाबून त्याचा खून केला. १४ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता राहत्या घरी ही घटना घडली आहे. त्यानंतर हा सर्व प्रकार लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी या खुनाचं रहस्य उलघडत वडील विजय गणेश भंडलकर, मयत पियुष भंडलकरची आजी शालन गणेश भंडलकर व संतोष सोमनाथ भंडलकर या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. वडगाव पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
वडील विजय भंडलकर यांनी मुलगा पियुष याला ‘तू अभ्यास करत नाहीस’, ‘सारखा बाहेर खेळत असतोस’, ‘माझी इज्जत घालवणारा दिसतोयस’, असे म्हणत त्याला मारहाण केली. मारहाण केल्यानंतही विजयचा राग शांत झाला नाही म्हणून त्याने पियुषचा त्याचा गळा दाबून त्याला भिंतीवर आपटले. यात चिमुकल्या पियुषचा मृत्यू झाला. पियुषची आजी हे सर्व पाहत होती, परंतु तिने मुलगा विजयला अडवलं नाही. त्यानंतर विजयच्याच सांगण्याप्रमाणे शालन भंडलकर यांनी ‘आमचा नातू पियुष चक्कर येवून पडला’ अशी अफवा गावभर उडवली. तर, संतोष भंडलकर याने डॉ. भट्टड यांच्या दवाखान्यात पियुषला नेलं.
खून लपवण्यासाठी विजय व कुटुंबाचे प्रयत्न, अंत्यविधीची तयारी
विजयच्याच सांगण्यावरून संतोषने डॉक्टरांना पियुष हा चक्कर येवून पडल्याची खोटी माहिती दिली. डॉक्टरांनी पियुषची प्राथमिक तपासणी करून त्याला होळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेवून जाण्याचा सल्ला दिला. मात्र, पियुषला प्राथमिक आरोग्य केंद्रात न नेता आणि मयताबाबत गावातील पोलीस पाटील अथवा इतर कोणालाही काहीही न सांगता विजयने अंत्यविधीची तयारी सुरू केली. मयताचे शवविच्छेदन न करता नातेवाईकांना बोलावून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने विजयने लवकरात लवकर अत्यंविधी उरकून घेण्याचा प्रयत्न सुरू केला.
…अन् खबऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी विजयचा डाव हाणून पाडला
एका बाजूला विजयने अत्यंविधीची तयारी सुरू केलेली असताना पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पोलिसांना त्यांच्या खबऱ्यांनी यासंबंधीची माहिती दिली. त्यानंतर पोलीस तातडीने गावात दाखल झाले. पोलिसांनी अत्यंविधी थांबवून पियुषचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बारामतीला नेला. पुढील तपासांत विजयनेच मुलगा पियुषची हत्या केल्याचं उघड झालं. बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी या हत्या प्रकरणाची व तपासाची माहिती दिली आहे.