पुणे : बारामती येथील नमो महारोजगार मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेवरून झालेल्या वादानंतर आता तसाच आणखी एक प्रकार समोर आला आहे. मात्र, या वेळी प्रशासनाने निमंत्रण पत्रिका छापण्यापूर्वीच चुकीची दुरूस्ती करून वाद टाळला आहे.
बारामती येथील नमो महारोजगार मेळाव्याचा कार्यक्रम झाल्यानंतर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळ स्मारक आणि येथील विकासकामांचा भूमीपूजन समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.
हेही वाचा – धक्कादायक : नमो महारोजगार मेळाव्याच्या नावाखाली ३० हजार ‘ट्रेनीं’ची पदे
हेही वाचा – राज्यात दहावीची परीक्षा सुरू, पहिल्या दिवशी कॉपी प्रकरणे किती?
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे, तर उपस्थितांमध्ये शहरासह जिल्ह्यातील लोकसभा, राज्यसभेचे खासदार आणि विधानसभा, विधानपरिषदेचे आमदार यांची नावे टाकण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतून माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांचे नाव टाकण्यात आले नव्हते. मात्र, आढळराव यांची नुकतीच महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) पुणे मंडळाच्या सभापतीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे ऐनवेळी आढळराव यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत टाकण्यासाठी जिल्हा प्रशासनाची शुक्रवारी धावाधाव झाली. अखेर प्रमुख पाहुण्यांमध्ये आढळराव यांचे नाव समाविष्ट करून निमंत्रण पत्रिका छापम्यात आली.