बारामती : बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने बेफाम वेगाने वाहने चालविण्यांवर कारवाईचा बडगा उगारला असून, त्यासाठी स्थापन केलेल्या वायुवेग या पथकाने गेल्या वर्षभरात ९ हजारांहून अधिक वाहनचालकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून सुमारे सात कोटी रुपये इतका दंड वसूल करण्यात आला.
बारामतीत वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रमाण वाढल्याने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत वायुवेग पथक स्थापन करण्यात आले. या पथकासाठी चार वाहने उपलब्ध करून देण्यात आली. या पथकामध्ये मोटार वाहन निरीक्षक निरंजन पुनसे, चंद्रमोहन साळोखे, नितीन घोडके, गंगाधर मेकलवार, बजरंग कोरावले, पद्माकर भालेकर, वायुवेग पथकाचे चालक विठ्ठल गावडे यांची नेमणूक करण्यात आली.
गेल्या वर्षभरात या पथकाने २५ हजार ६०० वाहनांची तपासणी केली. त्यामध्ये नऊ हजार वाहनचालकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून ६ कोटी ९५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी सांगितले. वेगाने वाहने चालविणाऱ्यांबरोबरच अवैध प्रवासी वाहतूक, काचांवर काळी फिल्म लावणे, परवाना नसताना वाहन चालविणे, असे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवरही कारवाई करण्यात आल्याचे निकम यांनी स्पष्ट केले.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा महसूल
वर्ष – महसूल
२०२२-२३ – ३ कोटी ९६ लाख ७ हजार
२०२३-२४ – २ कोटी ७३ लाख ७० हजार
२०२४-२५ – ६ कोटी ९५ लाख ८ हजार
वाहनचालकांनी नियमांचे पालन करण्यासाठी वायुवेग पथकाकडून विशेष प्रयत्न करण्यात आले. कारवाईबरोबरच जनजागृती करण्यावरही भर देण्यात आला. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रमाण तसेच अपघातांचे प्रमाणही कमी झाल्याचे दिसून येते.
सुरेंद्र निकम, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बारामती</strong>