आता एसटीचे विभागीय कार्यालय थाटण्याचा घाट

‘पॉवर फुल’ राजकीय गड समजल्या जाणाऱ्या बारामतीमध्ये आता एसटीचे विभागीय कार्यालय थाटण्याचा घाट घातला जात आहे. शेजारील जिल्ह्यतील वीज ग्राहक ओरबाडून यापूर्वी महावितरणचे परिमंडल कार्यालय बारामतीत सुरू करण्यात आले होते. आता एसटीच्या विभागीय कार्यालयासाठीही त्याच धर्तीवर पुण्यासह, सोलापूर आणि साताऱ्यातील काही एसटी आगारं ओरबाडून विभागीय कार्यालय उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

एसटी महामंडळाचे मुख्यालय मुंबईत असून, राज्यात एकूण ३१ विभागीय कार्यालये आहेत. प्रत्येक कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी आहे. तालुक्याच्या ठिकाणी असे कोणतेही कार्यालय नाही. पुणे जिल्ह्यतील बारामती तालुक्यात मात्र विभागीय कार्यालय निर्मितीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुणे विभागांतर्गत येणाऱ्या आगारांमध्ये प्रवाशांची संख्या मोठी असल्याचे कारण त्यासाठी देण्यात येत आहे. बारामतीमध्ये एसटीची दोन आगार आहेत. विभागीय कार्यालयासाठी ही संख्या पुरेशी नाही. त्यामुळे पुणे विभागातील दौंड, इंदापूर, शिरूर या तीन आगारांसह सोलापूर विभागातील करमाळा आणि अकलूज आणि सातारा विभागातील फलटण ही एसटीची आगारे बारामतीला जोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

नियोजित विभागीय कार्यालयास जोडल्या जाणाऱ्या एसटी आगारांतील प्रवाशांची संख्या, नफा- तोटा, चलनीय स्थिती त्याचप्रमाणे भौगोलिक, राजकीय, प्रशासकीय स्थितीची माहिती संबंधितांकडून मागविण्यात आली आहे. नवीन विभाग निर्मितीसाठी आवश्यक निकषांवर आधारित मतही मागविण्यात आले असून, महामंडळाच्या महाव्यवस्थापकांकडून पुणे विभागाला याबाबत पत्र पाठविण्यात आले आहे.

काही वर्षांपूर्वी  याच धर्तीवर महावितरण कंपनीचे परिमंडल कार्यालय बारामतीत थाटले गेले. त्याही वेळी परिमंडलासाठी ग्राहकसंख्येचे गणित जुळविण्यासाठी पुणे परिमंडलासह, सोलापूर, सातारा आदी भागातील दहा लाखांहून अधिक वीजग्राहक बारामती परिमंडलाला जोडण्यात आले होते. आता एसटीच्या विभागीय कार्यालयाचे नियोजन आहे. त्यासाठी स्वतंत्र इमारत, अधिकारी आणि कर्मचारीही नियुक्त करावे लागतीत. एकूणच एसटी तोटय़ात असताना नव्या विभागीय कार्यालयाचा घाट कशासाठी, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.