पिंपरी : पिंपरी-चिंचवडचा मध्यवर्ती भाग असलेल्या पिंपरी विधानसभा मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी आमने-सामने आहेत. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून आमदार अण्णा बनसोडे आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत यांच्यात दुरंगी लढत होत असली, तरी ही लढाई एका अर्थी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात प्रतिष्ठेची लढाई आहे. या मतदारसंघात पिंपरी कॅम्पातील बाजारपेठ आणि झोपडपट्टीतील मते निर्णायक ठरतात.

जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या दोन्ही बाजूंच्या परिसराचा समावेश असलेला पिंपरी विधानसभा मतदारसंघ संमिश्र लोकवस्तीचा आहे. अनुसूचित जाती (एससी) साठी राखीव असलेल्या या मतदारसंघाची २००९ मध्ये निर्मिती झाली. तेव्हापासून झालेल्या तीन निवडणुकांमध्ये दोनदा राष्ट्रवादी आणि एकदा शिवसेनेने बाजी मारली. २००९ आणि २०१९ मध्ये अण्णा बनसोडे, तर २०१४ मध्ये शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार निवडून आले. एके काळी बालेकिल्ला असलेल्या शहरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीमध्ये केवळ पिंपरीची एकमेव जागा मिळाली आहे. त्यांनी विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांना चौथ्यांदा उमेदवारी दिली. बनसोडे यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेऊन पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल, तसेच महायुतीमधील घटक पक्षांच्या माजी नगरसेवकांनी त्यांना उमेदवारी देण्यास तीव्र विरोध केला होता. शिवसेनेचे (शिंदे) खासदार श्रीरंग बारणे यांनीही उमेदवार बदलला, तर यश मिळेल, असे सांगून अप्रत्यक्षपणे बनसोडे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला होता. त्यानंतरही अजित पवार यांनी बनसोडे यांनाच पुन्हा उमेदवारी दिली. बनसोडे भाजपसोबतच्या पहाटेच्या आणि दुपारच्या दोन्ही वेळच्या शपथविधीवेळी पवार यांच्यासोबत कायम होते, त्यामुळे त्यांना निष्ठेचे फळ मिळाल्याचे बोलले जाते.

Yashomati Thakur's allegations on Sunil Karhade of NCPSP.
Yashomati Thakur: “शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याकडून २५ लाखांची मागणी,” काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा आरोप
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Jitendra Awhad comment on Ajit Pawar,
साहेब जातात कधी याची वाटच अजित पवार पाहत आहेत, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप
BJP and Rashtriya Swayamsevak Sangh have focused on Belapur assembly constituency
बेलापुरात झाडाझडती, ऐरोलीकडे पाठ; भाजप, रा. स्व. संघाची रणनीती
jayant patil islampur loksatta
सांगलीत जयंत पाटील यांची कसोटी
maharashtra assembly election 2024 , manoj jarange,
आरक्षणाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या घनसावंगीमध्ये मनोज जरांगे कोणाच्या बाजूने ?
congress and bjp are accusing each other of hooliganism and terror in nilanga
निलंग्यात गुंडगिरी, दहशतीवरून आरोप प्रत्यारोप
shweta mahale vs congress rahul bondre
चिखलीत ‘ताई’ आणि ‘भाऊ’ची प्रतिष्ठा पणाला; तुल्यबळ लढतीत कोण बाजी मारणार?

आणखी वाचा-शरद पवार म्हणाले, केंद्रित झालेली सत्ता…

विरोध डावलून दिलेली उमेदवारी आणि शहरात एकाच मतदारसंघात निवडणूक लढत असल्याने अजित पवार यांची पिंपरीत प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नाराज माजी नगरसेवकांची मनधरणी करण्यात बनसोडे यांना यश आले आहे. अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या चंद्रकांता सोनकांबळे, जितेंद्र ननावरे, काळूराम पवार यांनी माघार घेतली. ही बनसोडे यांच्यासाठी जमेची बाजू असली, तरी पाच वर्षे जनसंपर्काचा अभाव, विधानसभेत प्रश्न न मांडणे यामुळे मतदारसंघात बनसोडे यांच्याबाबत नाराजीची सुप्त लाट असल्याचे दिसते. शहरातील सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या पिंपरी कॅम्प परिसरातील व्यापाऱ्यांची नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान बनसोडे यांच्यासमोर असणार आहे.

महाविकास आघाडीकडून शिवसेनेने (ठाकरे) या मतदारसंघावर दावा केला होता. परंतु, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्ष या मतदारसंघावर ठाम होता. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा मतदारसंघ दुसऱ्या पक्षाला सोडण्यास तीव्र विरोध केला. आग्रहाने हा मतदारसंघ पक्षाकडे घेतला. पक्षातील आणि पक्षाबाहेरील अनेक सक्षम उमेदवार इच्छुक असतानाही माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत यांना उमेदवारी दिली. पक्षफुटीनंतर शिलवंत या एकट्या ठामपणे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षासोबत राहिल्या. तसेच, २०१९ मध्ये जाहीर केलेली त्यांची उमेदवारी ऐन वेळी रद्द करण्यात आली होती. त्यामुळे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने शिलवंत यांनाच उमेदवारी दिली.

आणखी वाचा-रपेट मारण्याची बतावणी; बुलेट घेऊन चोरटा पसार, कोंढवा भागातील घटना

शिलवंत ज्या संत तुकारामनगर प्रभागातून त्या निवडून आल्या, या प्रभागात राष्ट्रवादी (अजित पवार) आणि भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे प्रभागातून मताधिक्य मिळविण्याचे त्यांच्यासमोर आव्हान असेल. आमदार बनसोडे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेला पिंपरीतील व्यापारी वर्ग, सर्वपक्षीय माजी नगरसेवकांची मदत होईल, असा त्यांचा कयास आहे. या मतदारसंघातील आकुर्डी, निगडी, प्राधिकरण या उच्चभ्रू भागातील मतदार हा भाजपचा पाठीराखा असल्याचे मानले जाते. हा मतदार कोणाच्या पाठीशी राहतो, यावर तसेच झोपडपट्टीबहुल भागावर बरीच गणिते अवलंबून असतील.

असा आहे मतदारसंघ

एकूण मतदार : ३,९१,६०७
पुरुष मतदार : २,०४,००५
महिला मतदार : १,८७,५६८
तृतीयपंथी : ३४