पुणे : व्यवस्थापनशास्त्र पदवी (बीबीए, बीएमएस), संगणक उपयोजन पदवी (बीसीए) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) २७ ते २९ मे दरम्यान घेतली जाणार आहे. मात्र, या प्रवेश परीक्षेविषयी विद्यार्थी, पालकांमध्ये जागृतीचा अभाव असून, त्याचा प्रवेशांना फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे नोंदणीसाठी मुदतवाढीची मागणी केली जात आहे.
राज्यभरातील बीबीए, बीएमएस, बीसीए अभ्यासक्रमांच्या एक लाखांपेक्षा जास्त जागा आहेत. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) हे अभ्यासक्रम स्वत:च्या अखत्यारित घेतले. त्यामुळे या अभ्यासक्रमांना व्यावसायिक दर्जा मिळाला आहे. या अभ्यासक्रमांच्या मान्यतेसाठी एआयटीसीईची मान्यताही बंधनकारक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सीईटी सेलकडून या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्यस्तरीय सीईटी घेतली जाणार आहे. विनासीईटी या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळणार नाही. ही परीक्षा २७ ते २९ मे या कालावधीत होणार आहे. त्यासाठी सीईटी सेलने नोंदणी प्रक्रिया सुरू करून अर्ज भरण्यासाठी ११ एप्रिलपर्यंतची मुदत दिली आहे.
हेही वाचा – पुणे: तंत्रशिक्षणाची प्रश्नपत्रिका आता भाषासुलभ! काय आहे ‘एसआयसीटीई’चा निर्णय?
मॉडर्न महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शामकांत देशमुख म्हणाले, की बीबीए, बीसीए अशा अभ्यासक्रमांचा चांगला प्रतिसाद असतो. या पदवीधारक विद्यार्थ्यांना रोजगारसंधीही मिळत असल्याने वाणिज्य पदवीपेक्षा या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा असतो. आतापर्यंत या अभ्यासक्रमांचे प्रवेश महाविद्यालय स्तरावर गुणवत्तेच्या आधारे होत होते. मात्र यंदापासून या अभ्यासक्रमांचे प्रवेश सीईटीमार्फत होणार आहेत. या सीईटीबाबत विद्यार्थी, पालकांमध्ये अद्याप पुरेशी जागृती झालेली नाही. त्यामुळे सीईटीला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद न मिळाल्यास त्याचा फटका प्रवेशांना बसू शकतो. त्यामुळे बारावीच्या परीक्षेनंतर पुरवणी सीईटी घेणे उपयुक्त ठरू शकते.
बीबीए, बीसीए अशा अभ्यासक्रमांसाठी होणाऱ्या सीईटीबाबत विद्यार्थी, पालकांमध्ये पुरेशी माहिती पोहोचलेली नाही. त्यामुळे ही सीईटी दोनवेळा घ्यावी लागण्याची शक्यता आहे. मेअखेरीस होणाऱ्या या सीईटीच्या नोंदणीची अंतिम मुदत ११ एप्रिल आहे. नोंदणीसाठी किमान एप्रिलअखेरपर्यंत मुदतवाढ दिली पाहिजे. – विवेक वेलणकर, करिअर मार्गदर्शक
हेही वाचा – पुणे: इंग्रजी शाळांवर समाजमाध्यमांत जाहिराती करण्याची वेळ… नेमके झाले काय?
सीईटीशी संबंधित सर्व घटकांशी सीईटीबाबतच्या माहितीसाठी संकेतस्थळ नियमितपणे पाहिले पाहिजे. सीईटी सेलकडून या सीईटीबाबत विविध माध्यमांतून प्रचार करण्यात येत आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सीईटी देण्याचे आवाहन केले जात आहे. या अभ्यासक्रमांना आता व्यावसायिक दर्जा प्राप्त झाल्याने विद्यार्थ्यांना रोजगारसंधीही मिळणार आहेत. विद्यार्थीसंख्या कमी असल्यास सीईटीच्या अर्जांसाठी मुदतवाढ देता येऊ शकेल. – महेंद्र वारभूवन, आयुक्त, सीईटी सेल