चोरी, दरोडा या गुन्ह्य़ांपेक्षा ‘व्हाईट कॉलर’ गुन्हेगारीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. कंपनी काढून गुंतवणुकीच्या आमिषाने नागरिकांची वर्षांला सातशे कोटींची फसवणूक होत आहे. त्यामुळे नागरिकांनी दाम दुप्पट आणि व्याजाच्या खूप मोठय़ा अपेक्षा ठेवून कष्टाची रक्कम अशा योजनांमध्ये गुंतविणे म्हणजे फसवणुकीला निमंत्रण देण्यासारखे आहे. या फसव्या गुंतवणुकीपासून नागरिकांनी सावध रहावे, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी नागरिकांना केले.
पुणे पोलीस दलाच्या वतीने शहरातील नागरिकांचा चोरीला गेलेला मुद्देमाल वाटपाचा कार्यक्रम पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पोलीस आयुक्त सतीश माथूर, सह पोलीस आयुक्त संजय कुमार आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
चोराला पकडून माल हस्तगत करण्यात पुणे पोलीस राज्यात प्रथम क्रमांकावर आहेत. आता दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल या वर्षी परत केला आहे. त्यांनी केलेले काम पोलीस दलाची उंची वाढविणारे आहे, असे सांगून पाटील म्हणाले की, पुणे शहराची लोकसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्या दृष्टीने पोलिसांची ताकद वाढविण्याचे प्रयत्न शासनाकडून करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पुणे पोलिसांवर बंदोबस्ताचा मोठा ताण आहे. चोरांना पकडून हस्तगत केलेला माल नागरिकांना दिला जात आहे. मात्र, त्यांना शिक्षा होण्याची गरज आहे. त्यामुळे मुद्देमाल मिळालेल्या नागरिकांनी आपला माल मिळाला, आता काय देणे-घेणे नाही असे समजू नये. या आरोपींच्या विरोधात न्यायालयात जाऊन साक्ष द्या. एक नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडा. तुम्हाला न्यायालयात पुन्हा-पुन्हा यावे लागणार नाही याची काळजी घेतली जाईल.
गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी तीन हजार पोलीस मित्र तयार केले आहेत. खासगी वेशातील पोलीस ही सुद्धा एक देश आणि समजसेवा आहे. पोलिसांनी सुद्धा काम करताना जनतेचे मित्र बनून त्यांच्या सोबत काम करावे. पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना सन्मानाची वागणूक मिळावी, म्हणजे त्या नागरिकाला पोलीस ठाण्यात निर्भीडपणे जावे वाटेल, असे वातावरण निर्माण करावे, अशी अपेक्षा पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
 
डॉ. दाभोलकरांचे आरोपी पकडल्याशिवाय स्वस्त बसू नये
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) कडे गेला आहे. मात्र, महाराष्ट्र पोलिसांची जबाबदारी टाळता येणार नाही. डॉ. दाभोलकर यांचे मारेकरी पकडल्याशिवाय पोलिसांनी स्वस्त बसू नये. या गुन्ह्य़ातील मारेकरी न्यायालयासमोर आणेपर्यंत त्यांनी जिद्द सोडता काम नये. या प्रकरणी यश निश्चीत येईल. ते यश पुणे पोलिसांचेच असेल, असा विश्वास गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी व्यक्त केला.
 
ढोलचा आवाज आला, मिरवणूक थोडीशी उशिरा निघाली अशा किरकोळ स्वरूपाच्या गोष्टींकडे पोलिसांनी लक्ष न देता बॉम्बस्फोट होणार नाही, कोणा महिलेची छेड निघणार नाही, या गोष्टींकडे जास्त लक्ष द्यावे, असे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पोलिसांना सुनावले. मात्र, आवाजाबाबत न्यायालयाने केलेल्या कायद्याचे पालन करावे. कायदे आणि नियम हे जनतेच्या हितासाठी असतात. त्यामुळे त्याचे पालन करावे, अशी सूचना गणेश मंडळांना केली.

Story img Loader