लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live in Relationships) राहात असलेल्या तरुणीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने तरुणाने बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. तरुण आणि तरुणी दोघेही शिक्षण घेत आहेत.
योगेश्वर शशिकांत पगारे असं अटक करण्यात आलेल्या २५ वर्षीय तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी २५ वर्षीय पीडित तरुणीने हिंजवडी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. आरोपी योगेश्वर हा हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेत आहे. पीडित तरुणी बिझनेस मॅनेजमेंट करत आहे, अशी माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली.
आरोपीकडून पहाटेच्यावेळी तरूणीकडे शारीरिक संबंधांची मागणी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश्वर आणि तरुणी हे गेल्या काही दिवसांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकाच प्लॅटमध्ये राहतात. दरम्यान, ४ दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास योगेश्वरने तरुणीला मला तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत असं म्हणत विचारणा केली. तेव्हा, तरुणीने त्याला नकार दिला. यावरून त्यांच्यात वाद झाला. याच रागातून योगेश्वरने तरुणीला नॉन-स्टिकी तव्याने हातावर आणि पोटावर मारहाण केली.
हेही वाचा : “आता लिव्ह-इन रिलेशनशिप…”, अलाहाबाद उच्च न्यायालयानं मांडलेली भूमिका चर्चेत!
मारहाणीनंतर आरोपी योगेश्वरने तरुणीला प्लास्टिक पेनने जखमी केल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे. या घटनेबद्दल तरुणीने कुटुंबातील व्यक्तींना सांगितले. यानंतर वडील आणि भाऊ आल्यानंतर योगेश्वर विरोधात तरुणीने हिंजवडी पोलिसात तक्रार दिली. या प्रकरणी योगेश्वरला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सपना देवतळे करत आहेत.