भक्ती बिसुरे

देशातील तरुण-तरुणींकडून अनोखा दानयज्ञ; कृतीला चळवळीचे स्वरूप

आधुनिक जीवनशैलीतील आजारांपैकी केवळ नावानेही प्रत्येकाला धडकी भरवणारा आजार म्हणजे कर्करोग. केमोथेरपी उपचारांदरम्यान शरीरावरील केस गळून पडल्यानंतर कर्करोगाशी सामना करणारे अनेक रुग्ण आपले मानसिक स्वास्थ्य गमावून बसतात. अशा रुग्णांना उपयुक्त कृत्रिम ‘विग’ तयार करण्यासाठी अनेक व्यक्ती आपले सुंदर, लांबसडक केस देऊन एक आगळावेगळा दानयज्ञ चालवत आहेत.

अनेक महिला आणि पुरुष सध्या कर्करोग झालेल्या रुग्णांसाठी आपले केस देण्यास पुढे येत आहेत. ‘होप फॉर हेअर इंडिया’सारख्या स्वयंसेवी संस्थेमुळे या कृतीला चळवळीचे स्वरूप आले आहे. कर्करुग्णाला उपचारांदरम्यान मानसिक उभारी मिळवून देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत आहे. शाम्पू आणि कंडिशनर वापरून धुतलेले, त्यानंतर कोणतेही सौंदर्यप्रसाधन न वापरलेले केस कर्करुग्णांसाठी विग निर्मितीसाठी वापरले जातात. रासायनिक उपचार केलेले केस मात्र शक्यतो स्वीकारले जात नाहीत.

‘होप फॉर हेअर इंडिया’ च्या प्रेमी मॅथ्यू म्हणाल्या, २०१३ मध्ये मी कर्करोगातून बरी झाले. कर्करोग उपचारांमध्ये डोक्याचे, पापण्यांचे, भुवयांचे केस जाणे रुग्णासाठी किती वेदनादायी असते हे मी जाणते. नैसर्गिक केसांच्या विगची किंमत जास्त असते, सामान्य रुग्णांना तो खर्च परवडत नाही. त्यामुळे मी केस दान करण्यासाठी समाजात आवाहन करण्यास सुरुवात केली. त्याला प्रतिसाद म्हणून केवळ महिलाच नव्हे तर लहान मुले आणि पुरुषदेखील प्रयत्नपूर्वक केस वाढवून ते दान करतात.

नीता शर्मा गुजराल यांनी कर्करोगामुळे निवर्तलेल्या आपल्या दिवंगत आईच्या स्मरणार्थ केस दान केले. शरण्या कोंजेती हिने वयाच्या आठव्या वर्षी केस दान केले होते. पुण्यातील सर्वात लहान वयाच्या केस दात्यांपैकी शरण्या एक आहे. लेंडल सनी या मुंबईतील सत्तावीसवर्षीय तरुणाने देखील दोन वेळा केस दान केले आहेत. लेंडल सांगतो, हौस म्हणून केस वाढवले असता चर्चमधील फादर यांनी केस वाया न घालवता दान करण्यास सुचवले. त्यानंतर मुद्दाम केस वाढवून मी दोन वेळा बारा इंच केस कर्करुग्णांसाठी दान केले.

केस कसे द्यावेत?

* शाम्पू, कंडिशनरने धुतलेले, सौंदर्यप्रसाधन न वापरलेले केस द्यावेत.

* कृत्रिम रंगवलेले, रासायनिक उपचार केलेले केस देऊ नयेत.

* केसांचा पोनी बांधून किंवा वेणी घालून सलग बारा इंच कापलेले केस द्यावेत.

* ‘होप फॉर हेअर इंडिया’ या संकेतस्थळावर याबाबत सर्व माहिती उपलब्ध आहे.

होते काय?

‘होप फॉर हेअर इंडिया’ या स्वयंसेवी संस्थेमुळे हा उपक्रम कृतीत आला. तीन वर्षे ते साठ वर्षे वयापर्यंत शेकडो व्यक्तींनी गेल्या सहा वर्षांमध्ये कर्करुग्णांसाठी आपल्या केसांना कात्री लावली आहे. नैसर्गिक रंगाचे सुमारे बारा इंच केस दान करण्यात येतात. नैसर्गिकरीत्या पिकलेले किंवा चंदेरी झाक आलेले केस स्वीकारले जातात. बारा इंच लांबीचे केस एकसलग कापलेले असतात, कारण त्यांचाच पुनर्वापर विग बनवण्यासाठी होतो.

Story img Loader