पुणे : बालभारती जवळील सुंदर दगडी शिल्प ॲाईलपेंटने रंगवण्याचा असुंदर पराक्रम पुणे महापालिकेने केला आहे. सुशोभीकरणाच्या नावाखाली काळ्या पाषाणामध्ये साकारलेल्या शहरातील सुंदर शिल्पाचे ऑइलपेंटने रंगवून विद्रुपीकरण केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. सुशोभीकरण म्हणजे रंगरंगोटी आहे का? अशा पद्धतीने अजंठा आणि एलोरा येथील शिल्प रंगवणार का? असे मूलभूत प्रश्न हे शिल्प घडविणाऱ्या प्रशांत बांगल यांनी उपस्थित केले आहेत.
जी २० आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने शहराचा कायापालट होत आहे. लवकरात लवकर सुशोभीकरणाची कामे उरकण्याची लगीनघाई सुरू झाली आहे. त्यातच ही परिषद होणार असलेल्या सेनापती बापट रस्त्याच्या सुरुवातीला बसाल्ट स्टोन म्हणजेच, काळ्या पाषाणामध्ये घडविलेल्या शिल्पाला ऑईल पेंटने रंगविण्याचा प्रताप करण्यात आला आहे. ही मोठी चूक असून सुशोभीकरणाच्या नावाखाली आपण आपले अज्ञान दाखवायला निघालो आहोत, अशी व्यथा प्रशांत बांगल या शिल्पकाराने व्यक्त केली.
पुण्यामध्ये झालेल्या राष्ट्रकुल युवा स्पर्धेच्या निमित्ताने बांगल यांनी काळ्या पाषाणामध्ये हे शिल्प साकारले होते. बालभारती, सिम्बॉयसिस, विधी महाविद्यालय आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर या सेनापती बापट रस्त्यानजीक असलेल्या संस्थांचे शिक्षण कार्य ही मध्यवर्ती संकल्पना या शिल्पातून मांडण्यात आली आहे. काळ्या पाषाणामध्ये घडविलेले हे रस्त्यावरील एकमेव शिल्प असल्याची माहिती प्रशांत बांगल यांनी दिली. आपणच जन्माला घातलेल्या शिल्पकृतीची विटंबना पाहून व्यथित झालो असल्याची भावना बांगल यांनी व्यक्त केली.
सुशोभीकरण म्हणजे रंग फासणे एवढेच अभिप्रेत असेल तर ही मोठी चूक आहे. रस्ते रंगविण्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या माणसाने हे शिल्प रंगविले, असे सकृतदर्शनी दिसते. सार्वजनिक कलेविषयी अनास्था दाखवून तिचे असे विद्रुपीकरण करणे उचित नाही. हे टाळण्यासाठी सुशोभीकरणाच्या समितीमध्ये कला क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करायला हवा, अशी अपेक्षा बांगल यांनी बोलून दाखविली.
हेही वाचा – एकवीरा गडावर पोहोचा आता तीन मिनिटांत! रज्जू मार्गासाठी सल्लागार कंपनी नियुक्त
व्यावसायिक कलाकार म्हणून गेल्या दोन दशकांपासून कार्यरत असलेल्या बांगल यांनी गहुंजे येथील मैदानाच्या प्रवेशद्वारावर क्रिकेट महर्षी दि. ब. देवधर यांचे शिल्प साकारले आहे.