‘नमो सेवक बना’ हे आवाहन जनतेसाठी नाही, तर ते भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना केलेले आवाहन आहे. ‘नमो सेवक’ हे पक्षाचेही धोरण नाही. फक्त कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, पक्षाचे काम सुरू करावे यासाठी दिलेली ती हाक आहे, असे स्पष्टीकरण पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी, खासदार राजीव प्रताप रुडी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिले.
 गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन शहर भाजपतर्फे रविवारी (१४ जुलै) करण्यात आले असून या सभेच्या तयारीसाठी रुडी मंगळवारी पुण्यात आले होते. सभेच्या तयारीबाबत त्यांनी कार्यकर्त्यांची महाबैठक घेतली. पक्षाचे शहराध्यक्ष अनिल शिरोळे, खासदार प्रकाश जावडेकर, आमदार गिरीश बापट, भीमराव तापकीर, तसेच प्रा. मेधा कुलकर्णी, दिलीप कांबळे यांची या वेळी व्यासपीठावर उपस्थिती होती. या बैठकीत रुडी यांनी नमो (नरेंद्र मोदी) सेवक बना, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत रुडी यांना या आवाहनाबद्दल विविध प्रश्न विचारण्यात आले. हे पक्षाचे धोरण आहे का, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यासारख्या नेत्यांबद्दलही यापूर्वी असे आवाहन करण्यात आले नव्हते. मग मोदींसाठी हे आवाहन का, अशी विचारणा केली असता रुडी म्हणाले की, असे पक्षाचे धोरण नाही. ही फक्त कार्यकर्त्यांसाठी दिलेली घोषणा आहे. कार्यकर्त्यांना आम्ही तसे आवाहन करत आहोत. ही लोकांसाठी दिलेली घोषणा नाही.
आगामी लोकसभा निवडणुका महाराष्ट्र भाजप कोणाच्या नेतृत्वाखाली लढवणार, या प्रश्नाला, नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप ही निवडणूक लढेल, असे उत्तर रुडी यांनी दिले.
स्वातंत्र्यानंतर प्रथमच बिहारमध्ये बॉम्बस्फोट झाले असून दहशतवाद सर्वत्र पसरल्याचेच त्यावरून दिसत आहे. बांगलादेशींची घुसखोरी आणि त्यांनीच केलेला हा उद्योग आहे, असा आरोप करून रुडी म्हणाले की, अशाही परिस्थितीत काँग्रेस या बॉम्बस्फोटांवरून मोदी यांच्यावर आरोप करत आहे. हा प्रकार अत्यंत चुकीचा आणि निषेधार्ह आहे.
केंद्र सरकारने आणलेल्या अन्न सुरक्षा विधेयकाला भाजपचा विरोध नाही. मात्र, निवडणुकीच्या तोंडावरच हे विधेयक आणले जात आहे त्याला आमचा आक्षेप आहे. त्याबरोबरच त्यातील काही तरतुदीही चुकीच्या असल्याचे सांगून रुडी म्हणाले की, डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारखा अर्थतज्ज्ञ पंतप्रधान असूनही रुपयाची घसरण सुरू आहे आणि महागाई देखील वाढतच आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम काँग्रेसला निवडणुकीत भोगावाच लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा