पुणे : बीड जिल्ह्यातील एका तरुणीने छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना 14 मार्चला घडली.त्या घटनेला जवळपास एक महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे.या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुलीच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिलं आहे.तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने आत्महत्या केली.तिच्या मृत्यूला एक महिना उलटून गेला तरीही आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत असे त्या मुलीच्या आईने हे पत्रात म्हटलं आहे.हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेक राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली.
त्या सर्व घडामोडी दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्हय़ाचे पालकमंत्री अजित पवार हे पुणे दौर्यावर होते.त्यावेळी आत्महत्या केलेल्या तरुणीच्या आईच्या पत्राबाबत विचारले असता ते म्हणाले, त्या तरुणीच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र पाठवलं आहे.त्या प्रकरणातील आरोपीला कडक शासन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी,पोलिस अधीक्षक यांना देण्यात आल्या आहेत.या घटना घडू नये,याकरिता नागरिकांची मानसिकता बदलली पाहिजे,तसेच अशा प्रकारची विकृती थांबली पाहिजे.जर कोणी छेड काढली, कोणाबद्दल शंका कुशंका असल्यास तात्काळ पोलिसांकडे तक्रार करा,आम्ही संबधित तक्रारदार व्यक्तीच नाव गुप्त ठेवू आणि कारवाई करू असे आवाहन देखील यावेळी त्यांनी नागरिकांना केले.
मुलीच्या आईने पत्रात काय म्हटलं आहे पाहूयात
प्रति,
मा.एकनाथ शिंदे,
उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
सन्मानीय महोदय,साहेब मी तुमची लाडकी बहीण. तुम्ही मुख्यमंत्री झालात आणि राज्यातल्या अस्वस्थ झालेल्या बहिणींना आधार मिळाला. आपण मुख्यमंत्री असताना आपल्या म्हणजेच आम्हांसारख्या अगणित बहिणींना भावाचा बंध मिळाला. मी नाराज आहे, आज आपण उपमुख्यमंत्री आहात. मात्र माझ्यासाठी तुम्हीच लाडक्या बहिणींचे मुख्यमंत्री आहात. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर चालत आनंद दिघे यांची प्रेरणा घेऊन आपण राज्याचा कारभार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवशाही प्रमाणे हाताळत आम्हाला न्याय दिला. आम्ही त्याबद्दल ज्ञात आहोत. परंतु आज आम्हाला तुमची कमतरता भासते. माझी मुलगी साक्षी तिला हवाई सुंदरी व्हायचे होते. मात्र ती एका क्षणात नाहीशी झाली. काही मुलांनी तिची छेड काढली आणि साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेऊन आयुष्य संपवलं. साहेब, आम्ही आस धरुन आहोत. तुमची भाची साक्षी या जगात परत येणार नाही, हे आम्हाला देखील माहीत आहे. मात्र त्या क्रूर नराधमांना देखील तेवढीच शिक्षा होणं अपेक्षित आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमासाठी बीडमध्ये आले. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. सर्वांना माहीत आहे, आपण असला असता तर पीडित बहिणीला भेटल्याशिवाय गेला नसता. याची प्रचिती महाराष्ट्राला आणि लाडक्या बहिणींना आहे.
साहेब, बीडमध्ये केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर KSK महाविद्यालय आहे. याच महाविद्यालयात कला शाखेच्या तृतीय वर्षात साक्षी शिक्षण घेत होती. काही मुलांनी तिची छेड काढली. तिला ब्लॅकमेल करुन तिच्यासोबत अनैतिक कृत्य केलं. जबरदस्ती व्हिडीओ आणि फोटो काढण्यात आले. या अत्याचाराला कंटाळून साक्षीने मामाच्या घरी धाराशिव येथे जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. आम्ही बीडचे रहिवासी आहोत, आरोपीही बीडचाच राहणारा आहे. माझ्या मुलीने धाराशिव येथे असताना गळपास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे तो गुन्हा धाराशिव सिटी पोलीस ठाण्यात नोंद आहे. शिंदे साहेब, तुम्हीच आम्हाला न्याय देऊ शकता. यावर आम्हाला ठाम विश्वास आहे. यात अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी चुकीचे काम केले आहे. धाराशिव येथील पोलीस उपअधीक्षक राठोड यांनी आमचा कसलाही जबाब घेतला नाही. उलट आम्हाला अपमानित केलं. आम्हाला तासंतास कार्यालयाबाहेर बसवण्यात आलं. ही बाब सीसीटीव्हीटीत कैद आहे. आरोपीची बहीणही यात आरोपी आहे. मात्र ती पोलीस दलात कार्यरत आहे त्यामुळे धाराशिव पोलीस आम्हाला कसलीही मदत करत नाहीत.
ज्या आरोपी मुलाने छेडछाड केली, माझ्या मुलीला ब्लॅकमेल केलं त्याच्या मोबाइलमधील चॅटिंग पोलिसांनी अद्याप उघड केलेलं नाही. तसंच केएसके महाविद्यालयातील इतर दोन मुलींनीही अशाच छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली. आरोपी मुलाचे बीड शहरातील गुंडांशी संबंध असल्याने कोणतेही पालक पुढे येऊन फिर्याद देत नाहीत. या गुंडांची दहशत पाहता आम्ही कोणाला न्याय मागायचा हा प्रश्न पडला आहे. साहेब आपण मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री असता तर या गुंडांचा खात्मा करुन आम्हाला न्याय दिला असता, आताही केवळ तुमच्याकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. आपण आम्हाला न्याय देऊन गुंडांना शिक्षा द्याल एवढीच अपेक्षा आहे.आपलीच लाडकी बहीण