पुणे: आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील काही तासांत जाहीर होणार आहे. पण त्या अगोदरच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीतील महत्वाचे नेते म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिले जात आहे. तर पुणे दौर्‍यावर शरद पवार असून आज शिवाजीनगर येथील मोदी बागेत आज सकाळपासून खासदार बजरंग सोनवणे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, शेकाप नेते आमदार जयंत पाटील, शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांसह अनेक नेत्यांनी भेट दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खासदार बजरंग सोनवणे यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला असता ते म्हणाले की, बीड जिल्ह्यात एकूणच राजकीय परिस्थितीबाबत शरद पवार यांना माहिती दिली आहे. महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील या दृष्टीने कामाला लागण्याचे आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : Ambegaon Assembly Elections 2024 : आंबेगावमध्ये मविआ की महायुती कोण बाजी मारणार? दिलीप वळसे पाटील बालेकिल्ला राखणार का?

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे बीड जिल्ह्यात मोठया प्रमाणावर सक्रिय झाले आहेत. दुसर्‍या बाजूला मराठा आणि ओबीसी ठिकठिकाणी वाद पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत त्याचा परिणाम दिसेल का? असा प्रश्न सोनवणे यांना विचारण्यात आला. त्यावेळी बंजरंग सोनवणे म्हणाले, मागील काही महिन्यांत बीड जिल्ह्याच्या नेतृत्वाने ओबीसी आणि मराठा असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण मला लोकसभा निवडणुकीत सर्व समाजाच्या नागरिकांनी मतदान केल्याने मी निवडून आलो आहे. जिल्ह्यात आजवर त्यांनी कोणतीही विकासकामे केली नाही. त्यामुळे स्थानिक समाजाचे, नागरिकांचे पाठबळ त्यांना कमी झाल्याचे वाटले. त्यामुळेच त्यांनी जातीचा मुद्दा उपस्थित केला. पण आता या निवडणुकीमध्ये जात हा फॅक्टर चालणार नसून बीड जिल्ह्यातील सर्व महाविकास आघाडीचे उमेदवार विधानसभा निवडणुकीत जिंकतील असे सांगत अप्रत्यक्षपणे अजित पवार गटाचे नेते बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.

हेही वाचा : गदिमा स्मारकासाठी २३ कोटी द्या महापालिकेने कोणाकडे केली मागणी

दसरा मेळाव्यात उपस्थित जनसमुदायाला भाजपाच्या नेत्या आमदार पंकजा मुंडे या मार्गदर्शन करतेवेळी म्हणाल्या की, आता कोयता घासून ठेवा, आता आपल्याला खेळ खेळायचा आहे. त्या विधानाबाबत बजरंग बाप्पा सोनवणे म्हणाले की, मागील दोन पिढ्या नुसता कोयता घासून ठेवायला सांगतात. माझ्या बीड जिल्ह्यातील जनतेला कधी तरी ऊस पण लावायला सांगा ना, नुसता कोयता घासून तोडायला लावता, त्यावरच भांडवल करून राजकारण करित आला आहात, हे कुठे तरी थांबले पाहिजे. एकदा चांगल बेन लावायला सांगा, मागील १० वर्षांपासून केंद्रात आणि राज्यात तुमचीच सत्ता आहे. जर खरंच तुम्ही विकास केला असं म्हणताय ना, तर या कालावधीत बीड जिल्ह्यासाठी पाणी आणयाला पाहिजे होते. मात्र ते काम काही केले नसल्याचे सांगत पालकमंत्री धनंजय मुंडे आणि आमदार पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beed leadership tried to create dispute among obc and maratha says ncp sharad pawar mp bajrang sonwane svk 88 css