Walmik Karad Arrested at Pune CID Office: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेले वाल्मिक कराड हे आता पुण्यातील सीआयडी कार्यालयात पोलिसांना शरण आले आहेत. शरण येण्यापूर्वी त्यांनी स्वतःचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये त्यांनी स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. राजकीय द्वेषापोटी माझ्याविरोधात आरोप केले जात असून जर पोलिस तपासात मी दोषी आढळलो तर जी शिक्षा होईल, ती भोगण्यासाठी मी तयार असल्याचे ते म्हणाले आहेत.
या व्हिडीओत ते म्हणाले, “मी वाल्मिक कराड. माझ्याविरोधात केज पोलीस ठाण्यात खंडणीची खोटी तक्रार दाखल झालेली आहे. मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असतानाही पुण्यातील पाषाण रोडवरील सीआयडी कार्यालयात शरण जात आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना फाशी द्यावी. पण राजकीय द्वेषापोटी माझे नाव त्यात जोडले जात आहे. पोलीस तपासात जर मी दोषी आढळलो तर न्याय देवता जी शिक्षा देईल, ती भोगण्यासाठी मी तयार आहे.”
दरम्यान आज वाल्मिक कराड स्वतःहून पोलिसांना शरण येतील किंवा त्यांना नाट्यमय पद्धतीने अटक करण्यात येईल, याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली होती. याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर सविस्तर भाष्य केले होते.
ते म्हणाले, “आजच्या दिवसभरात वाल्मिक कराड हा पोलिसांकडे स्वाधीन होईल, असे त्याच्या निकटवर्तीयांकडून समजले आहे. ही माहिती मी का देतोय कारण तो स्वतः पोलिसांना स्वाधीन झाल्यानंतर , एक पत्रकार परिषद घेण्यात येईल. या पत्रकार परिषदेत, त्याला पुण्याजवळील एका घाटात गाडीतून गोवा किंवा असे कुठे तरी लांब जात असल्याची माहिती पोलिसांना खबरींकडून मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून त्याच्या गाडीसमोर आडवी गाडी टाकून त्याला अडविला आणि त्याच्या काॅलरला धरून त्याला खेचत आणून गाडीत बसवला, अशा सगळ्या कहाण्या प्रसृत करण्यात येतील. पण, महाराष्ट्राने अशा कुठल्याही कहाण्यांवर विश्वास ठेवू नये”
कोण आहेत वाल्मिक कराड?
वाल्मिक कराड हे राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात. स्वतः पंकजा मुंडे यांनी एका जाहीर सभेत त्यांच्याबद्दल बोलताना म्हटले होते, “वाल्मिक कराड यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचेही पानही हलत नाही.” संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर विरोधकांकडून वाल्मिक कराड यांना लक्ष्य करण्यात आले. भ्रष्टाचारासह बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेसंबंधी काही प्रकरणे उपस्थित करून विरोधकांनी वाल्मिक कराड यांच्यावर अनेक आरोप केले आहेत.