चिन्मय पाटणकर

कैद्यांना मधमाशीपालनाचे धडे; २६ कारागृह कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

राज्यभरातील कारागृहांमध्ये आता मधमाशीपालनाचा प्रयोग केला जाणार आहे. केंद्रीय मधमाशी संशोधन आणि संशोधन संस्थेमध्ये २६ कारागृहांतील कर्मचाऱ्यांना प्रथमच मधमाशीपालनाचे प्रशिक्षण देण्यात येत असून, त्यानंतर कैद्यांना प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष मधमाशीपालनही करण्यात येईल. त्यातून तयार झालेल्या मधाची विक्री केली जाणार आहे.

राज्यभरातील पुणे, कोल्हापूर, नाशिक, बुलढाणा, विसापूर, पैठण, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, आटपाडी, वर्धा, रत्नागिरी आदी ठिकाणच्या कारागृहातील कर्मचाऱ्यांचा या प्रशिक्षणार्थीमध्ये समावेश आहे. त्यात कृषी सहायक, रक्षक, हवालदार, कारागृह अधिकारी पदावरील अधिकारी सहभागी झाले आहेत. कारागृहांमध्ये शेती आणि अन्य व्यवसाय केले जातात. त्याचे कैद्यांनाही प्रशिक्षण दिले जाते. त्यात आता मधमाशीपालनाचीही भर पडणार आहे.

मधमाशीपालन प्रशिक्षणाची कल्पना खूप चांगली आहे. कारागृहात मुबलक प्रमाणात शेती करण्यात येते. त्यात आता मधमाशीपालनाची भर पडेल. मधमाशीपालनामुळे होणाऱ्या परागीभवनाचा फायदा शेतीला होईल. शेतीची उत्पादकता वाढू शकेल. तसेच कैद्यांना मेणाचा वापर मेणबत्त्या आणि कलाकुसरीच्या वस्तू तयार करण्यासाठी होईल. या प्रशिक्षणामुळे वेगळे काहीतरी शिकायला मिळत आहे.

-अमेय पोतदार, कारागृह अधिकारी, रत्नागिरी

मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे संचालक दीप वर्मा यांनी मधमाशीपालन प्रशिक्षणाची कल्पना मांडली होती. येरवडा कारागृहात मधमाश्या पेटय़ा ठेवण्यात आल्या आहेत. कारागृहातील कर्मचाऱ्यांना पहिल्यांदाच मधमाशीपालनाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षणानंतर राज्यभरातील कारागृहामध्ये मधमाश्या पेटय़ा ठेवल्या जातील. त्यातून कैद्यांनाही प्रशिक्षण दिले जाईल. कारागृहातून बाहेर पडल्यावर कैद्यांसाठी मधमाशीपालन ही रोजगाराची संधी होऊ शकेल.

-संजय फडतरे, तंत्र अधिकारी, कारागृह शेती

होणार कसे?

कारागृहांमध्ये मोठय़ा प्रमाणात वृक्षराजी असल्याने मधमाशीपालनासाठी पूरक वातावरण असते. त्यामुळे कारागृहांमध्ये होणाऱ्या शेतीला मधमाशी पालनाची जोड देण्याची कल्पना मांडण्यात आली होती. त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारे प्रशिक्षण दिले जात आहे.

Story img Loader